मोरक्कोच्या गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार तब्बल १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पर्वतीय भागात अधिक मृत्यू झाले आहेत. पर्वतीय भागात बचावकार्य सुरु करणं देखील अडचणीचं होतं, अशी माहिती देण्यात आली आहे. मोरक्कोत शुक्रवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल इतकी होती.
जागतिक वारसा स्थळाचं नुकसान
माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार मोरक्कोतील माराकेश च्या जुन्या शहरातील यूनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ जेमा अल फना स्क्वायर मशिदीची एकमिनार पडली आहे. भूकंपानंतर माराकेश शहरातील एक व्यक्ती ब्राहिम हिम्मी यानं वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार शहरातील जुन्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. शहरातील लोक घाबरले असून दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्याच्या भीतीनं घरातून बाहेर पडले आहेत.
१९६० नंतरचा सर्वात मोठा भूकंप
मोरक्कोमध्ये १९६० मध्ये भीषण भूकंप झाला होता. त्या भूकंपामध्ये तब्बल १२ हजार जणांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरक्कोतील घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मोरक्कोतील भूकंपात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाप्रती नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. भारत मोरक्कोला जी लागेल ती मदत करण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले आहेत.
मोरक्कोला भूकंपाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी जगभरातील प्रमुख देशांनी मदतीचा हात पुढं केलेला आहे. अमेरिका, चीन, इंग्लंड, भारतासह विविध देशांनी मोरक्कोला या संकटातून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढं केला आहे. जी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय.