शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत हा पाणीसाठा १३ लाख ४८ हजार ४४९ दशलक्ष लिटर (९३.१७ टक्के) म्हणजे १४ मे २०२४पर्यंत होता. तर गुरुवारी सकाळी हा पाणीसाठा १३ लाख ७ हजार ९२३ दशलक्ष लिटर (९०.३७ टक्के) इतका होता. गुरुवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत सात तलावांतील पाणीसाठ्यात तब्बल ४० हजार ५२६ दशलक्ष लिटरने वाढ झाली. शुक्रवारच्या पावसाने सात तलावांतील पाणीसाठ्यात आणखी ११ दिवसांच्या साठ्याची भर पडली. दोन दिवसांत तब्बल २२ दिवसांच्या साठ्याची वाढ झाली आहे.
मुंबईला पावसाळा संपल्यानंतर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पुढील वर्षभरासाठी सात तलावांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. तरच वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा करणे शक्य होते. साठा कमी असल्यास किमान १० टक्के ते १५ टक्के इतकी पाणीकपात करावी लागते. सध्या सात तलावांतील पाणीसाठा मे २०२४पर्यंत पुरेसा इतका आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट जवळपास टळले आहे. अद्याप सप्टेंबरमधील तीन आठवडे शिल्लक आहेत. या कालावधीत आणखी चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित भातसा, मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा हे तीन तलावसुद्धा भरून वाहू लागतील. यापूर्वी जुलैमध्ये तानसा, मोडक सागर, तुळशी आणि विहार हे चार तलाव भरून वाहू लागले होते.
तलावातील पाणीसाठा व वाढ (दशलक्ष लिटर)
तलाव ८ सप्टेंबर ९ सप्टेंबर
अप्पर वैतरणा १,८४,९२६ १,९७,८३३
मोडकसागर १,२२,३२९ १,२८,९२५
तानसा १,४५,०८० १,४५,०८०
मध्य वैतरणा १,९०,७९७ १,८८,९००
भातसा ६,६९,५७३ ६,९५,९१२
विहार २७,६९८ २७,६९८
तुळशी ८,०४६ ८,०४६
एकूण १३,४८,४४९ १३,९२,४९३