म. टा. वृत्तसेवा, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आरोग्यसेवा रुग्णशय्येवर असून प्रशासनाकडून रुग्णालयात रुग्णांसाठी उपचारसुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गंभीर रुग्णांना तत्काळ आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांत प्रत्येकी १० खाटांचे आयसीयू, एनआयसीयू आणि पीआयसीयू उभारण्यात आले आहेत, मात्र एकीकडे हे आयसीयू केंद्र चलविण्यासाठी ठेकेदार मिळत नसताना, पैसे देऊनही हाफकिन इन्स्टिट्यूटकडून एनआयसीयूसाठी धाडण्यात आलेले नसल्याने पालिका आयुक्तांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला अल्टिमेटम धाडले आहे. तत्काळ व्हेंटिलेटर पाठवा, अन्यथा भरलेली रक्कम परत करा, अशा सूचना दिल्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई या दोन्ही रुग्णालयांत डॉक्टरांची आणि डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण देत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना कळवा, ठाणे किंवा मुंबईतील सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जातो, मात्र कल्याण-डोंबिवलीपासून मुंबईपर्यंतचे अंतर आणि वाहतूककोंडी यामुळे अनेकदा वाटेतच रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याने या रुग्णांना खासगी उपक्रमाच्या माध्यमातून कमीत कमी दरात किंवा मोफत आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामुळेच पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांत शासनाच्या निधीतून अद्ययावत आयसीयू, एनआयसीयू आणि पीआयसीयू विभाग उभारण्यात आले आहेत. प्रत्येकी १० खाटांच्या या विभागात रुग्णांना प्राधान्याने दाखल करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून हे तिन्ही आयसीयू ठेकेदाराच्या माध्यमातून चालविले जाणार आहेत, मात्र वारंवार निविदा काढूनही हे आयसीयू चालविण्यासाठी ठेकेदार मिळत नसल्याने प्रशासनाची गोची झाली आहे. पुन्हा एकदा प्रशासनाकडून यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली असतानाच या एनआयसीयूमध्ये अद्याप व्हेंटिलेटरच बसविण्यात आलेले नाहीत. पालिका प्रशासनाने हे व्हेंटिलेटर कडून खरेदी केले असले तरी मुदत संपून गेल्यानंतरही संस्थेने ते धाडलेले नसल्याने पालिका आयुक्तांनी त्याना अल्टिमेटम देत वेळेत व्हेंटिलेटर पुरविता येत नसतील तर पैसे परत करा, अशा खरमरीत सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here