जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी १० सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या स्पर्धा, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, बेरोजगारी, नात्यांमध्ये झालेली फसवणुक, आर्थिक व्यवहार, कर्ज, आजार, कौटुंबिक वाद, परीक्षेतील अपयश अशा विविध कारणांमुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात ६६ जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. २०२२ मध्ये ३८ तर २०२३ मध्ये आठ महिन्यांत २८ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात आहे. वाढलेल्या स्पर्धांमध्ये तरुण पिढीने आपल्या सुखदु:खाची नवी परिभाषा सीमित केली असून त्या परिघामधून ते थोडे जरी दुर्लक्षित झाले तर त्यांना आपले जीवन व्यर्थ वाटू लागते आणि त्यातूनच टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विजय साळुंखे सांगतात.
करोना काळामध्ये आजारामुळे समाजामध्ये असहाय्यता, एकांतवास, आर्थिक तणाव, नात्यात आलेला दुरावा यामुळे नैराश्य व चिंता वाढली. एकूणच मानसिक विकार वाढत असून परिणामी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे आत्महत्या रोखण्यासाठी संदेश दिला जात आहे. जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विजय साळुंखे, समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद, स्मिता भोसले, मनोरुग्ण तज्ज्ञ परिसेविका शर्मिला पठारे ह्या पथकाच्या मदतीने जिल्ह्यातील आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करत आहे. दीड वर्षात ६६ जणांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्यावर औषधोचार करून त्यांना नव्याने आयुष्य जगण्याची उमेद दाखविली आहे.
ठाणे जिल्ह्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नैराश्यामध्ये असलेल्या व्यक्तींना समुपदेशन आणि औषधोचार केल्यास अशा अनेक आत्महत्या टाळता येऊ शकतात. जिल्ह्यातील २५ ते ४० वयोगटातील आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्या टाळण्यासाठी कुटुंबीयांनी वेळीच त्या व्यक्तीच्या वर्तनातील बदलांचा विचार करून मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. विजय साळुंखे, मानसोपचार तज्ज्ञ, ठाणे जिल्हा रुग्णालय
वर्ष आत्महत्येचा प्रयत्न केलेले रुग्ण
२०२२ ३८
२०२३ जानेवारी ते ऑगस्ट २८