म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेतर्फे वाशी, ऐरोली व नेरूळ येथील तीन महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये व पालिकेच्या २४ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यामातून आरोग्य सेवा पुरवण्यात येते. पालिकेच्या रुग्णालयांमधील उत्तम आरोग्यसेवा आणि स्वच्छता यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील मानखुर्द, गोवंडी, मुंब्रा, पनवेल, उरण परिसरातील रुग्णदेखील येथे मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. पालिकेच्या दवाखान्यात ४० टक्के रुग्ण हे पालिका क्षेत्राबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेकडून नुकतेच सीटी स्कॅन मशिनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र एमआरआयची सुविधा नसल्यामुळे रुग्णाला आर्थिक भार सहन करावा लागत आहे. महापालिकेकडून फोर्टिस रुग्णालयामध्ये ८०० रुग्णांवर वर्षभरात मोफत उपचार केले जातात. पालिकेकडे सुपरस्पेशलिस्ट डॉक्टरांची सुविधा नसल्यामुळे, पालिका ज्या रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार देऊ शकत नाही, त्यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये पाठवले जाते. मात्र फोर्टिसमध्येही रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना मुंबईमधील जेजे, सायन, केईम रुग्णालयात पाठवले जाते.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिकांची कमतरता आहे. यामुळे पालिकेकडून ५० परिचारिकांची भरती करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभाागाच्या आधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची वाढती संख्या लक्षात घेता, पालिकेकडून पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. या संस्थेत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे पालिकेचे नियोजन आहे. ऐरोली व नेरूळ रुग्णालयातील खाटांची क्षमता प्रत्येकी १५०वरून वाढवण्यात आली आहे.

एका दिवसात ५-६ मृत्यू, रुग्ण बेडखाली, निकृष्ट दर्जाच्या सुविधा; जितेंद्र आव्हाड आक्रमक, अधिकाऱ्यांची कानउघाडणी


एमआरआयची सुविधा नसल्याने गैरसोय

वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात क्ष किरण तपासणी विभागात सीटी स्कॅन सुविधा अत्यल्प शुल्कात उपलब्ध आहे. परंतु अधिक प्रभावी तपासणीसाठी तसेच, अत्यवस्थ रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातून अधिक पैसे मोजून एमआरआय करून घ्यावे लागते. एमआरआय सुविधा महाग असल्यामुळे गरजूंसाठी पालिकेच्या रुग्णालयातच एमआरआयची व्यवस्था करून देण्यात येणार आहे, असे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची सुविधा नसली, तरी पालिका फोर्टिस रुग्णालयामधून उपचार करून घेते. परिचारिकांच्या ५० जागा भरण्यात येणार आहेत.

– डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका

एनआयसीयूला व्हेंटिलेटरची प्रतीक्षा, रुग्णांची हेळसांड; पालिका आयुक्तांच्या हाफकिनला कडक सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here