न्यायालयाकडून तीनही आरोपींना खून आणि बलात्कार या आरोपांसाठी फाशीची शिक्षा
कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१६ रोजी ही घटना घडली होती. यामध्ये जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. जिल्हा न्यायालयात अवघ्या १६ महिन्यांत निकाल लागला. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. तीनही आरोपींना खून आणि बलात्कार या आरोपांसाठी फाशीची शिक्षा सुनावली.
आरोपी शिंदे हा कोपर्डीतीलच रहिवाशी होता. तो गावातील वीट भट्टीवर कामाला होता. त्याचे आईवडीलही मजुरी करतात. १३ जुलै २०१६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नववीत शिकणारी मुलगी आपल्या आजोबांच्या घरून मसाला घेऊन सायकलवरून घराकडे निघाली होती. त्यावेळी आरोपी शिंदे याने तिला तुकाई लवण वस्ती येथे अडवून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर खून केला. तिचे दोन्ही हात मोडलेले आढळून आले होते.
अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी खटला सुरू होता. १३ नोव्हेंबर २०१७ रोजी या खटल्याच्या अंतिम युक्तिवादाचे कामकाज पूर्ण झाले आहे. सरकारी पक्षाकडून मृत मुलीची मैत्रिण, आई, बहीण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपास अधिकारी, पंच अशा एकूण ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तर आरोपी संतोष भवाळच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध २४ वेगवेगळे परिस्थितीजन्य पुरावे सादर केले होते. दरम्यान, या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली.