थिरुअनंतपुरम: केरळच्या एका जोडप्यानं पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या हॉटेलमध्ये दोघांनी आयुष्य संपवलं, त्याच हॉटेलमध्ये तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता.तीन महिन्यांपूर्वी जोडप्यानं एका दुसऱ्या हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता एका पंचतारांकित रुग्णालयात त्यांनी आयुष्याची दोर कापली. याच हॉटेलमध्ये त्यांनी ९० दिवसांपूर्वी मुलीचं लग्न थाटामाटात लावून दिलं होतं. ओणम सणादरम्यान जोडप्यानं हॉटेलमध्ये चेक-इन केलं होतं. हे जोडपं बहुतांश वेळ हॉटेलमधील त्यांच्या खोलीतच असायचं.सुगथन (७०) आणि सुनीला (६०) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली. जोडपं फारसं रुमबाहेर बाहेर नव्हतं, असं निरीक्षण कर्मचाऱ्यांनी नोंदवलं होतं. आत्महत्येपूर्वी जोडपं हॉटेलमधील अन्य पाहुण्यांप्रमाणे ओणमच्या समारंभात सहभागी झालं होतं. त्यांनी पारंपारिक पोशाख परिधान केला होता.हॉटेलचा सफाई कर्मचारी सुगथन आणि सुनीला यांच्या खोलीबाहेर गेला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बराच वेळ वाट पाहिली. मात्र तरीही आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडून खोलीत प्रवेश केला. तेव्हा त्यांना दोघांचे मृतदेह सापडले.मृतदेहांजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात आर्थिक विवंचनेचा उल्लेख होता. आमच्यावर असलेला आर्थिक भार मुलीवर टाकू नये, असं आवाहन त्यांनी मरण्यापूर्वी केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यातून महत्त्वाची माहिती उघडकीस आली. तीन वर्षांपूर्वी सुगथन यांनी मलयिन्कीझूमध्ये एक मालमत्ता खरेदी केली होती. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर कर्ज झालं. त्यानंतर मुलीचं लग्न आणि व्यावसायिक संघर्षामुळे त्यांच्यासमोरील आर्थिक विवंचना वाढल्या. त्यामुळे ते तणावात होते.