जयपूर: हॉटेलमध्ये थांबलेल्या परदेशी पर्यटकानं तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली उडी मारली. हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीतून उडी मारलेल्या पर्यटकाचा एक हात आणि दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी पर्यटकाला रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमधील जवाहर सर्कल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.सहायक पोलीस आयुक्त संजय शर्मांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा नॉर्वेचा असणारा फिन वेटले (३५) ७ सप्टेंबरपासून न्यू एअरपोर्ट रेसिडेन्सीमध्ये राहत होता. तीन महिन्यांपूर्वी तो इथे योग शिकण्यास आला होता. त्याचं योग प्रशिक्षण सुरू होतं. या दरम्यान त्याला भांग पिण्याची सवय लागली. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतलेल्या वेटलेची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यातून महत्त्वाची माहिती समोर आली.जन्माष्टमीच्या दिवशी वेटलेनं एका व्यक्तीला सांगून ५०० रुपयांची भांग मागवली होती. बदामासोबत तो भांग प्यायला. गुरुवारी रात्री तो हॉटेलच्या छतावर होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनाचा उत्सव सुरू झाला. आसपासच्या परिसरात आतषबाजी सुरू झाली. अनेकांनी फटाके लावले. भांगेच्या नशेत असलेला वेटले घाबरला. आसपास गोळीबार सुरू असल्याचं त्याला वाटलं. भेदरलेल्या अवस्थेत त्यानं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. खाली पडताना तो पहिल्या मजल्यावर आपटला. त्यामुळे त्याचा एक हात आणि दोन्ही पायांना फ्रॅक्चर झालं. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here