आदित्य एल १ पुढील कक्षा १५ सप्टेंबर रात्री २ वाजता बदलणार आहे. भारताचं सूर्ययान त्या दिवशी तिसऱ्या कक्षेतून चौथ्या कक्षेत प्रवेश करेल. याच दरम्यान आदित्य एल १ मिशनवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यानं सेल्फी पाठवली होती. पृथ्वी आणि चंद्राचा फोटो देखील पाठवला आहे.
आदित्य एल १ मिशन १८ सप्टेंबर पर्यंत पृथ्वीच्या चारी बाजूनं चार वेळा कक्षा बदलणार आहे. ज्यावेळी आदित्य एल १ लँग्रेज १ पॉइंटला पोहोचेल त्यावेळी १४४० फोटो पाठवणार आहे. सूर्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यासाठी इतक्या संख्येनं फोटो पाठवले जाणार आहेत.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्याचा पहिला फोटो आदित्य एल १ मिशन फेब्रुवारी २०२३ मध्ये पाठवणार आहे. आदित्य एल १ मिशनला १५ लाख किमीचं अंतर पार करावं लागणार आहे. हे यान लँग्रेज पाइंट १ ला पोहोचल्यावर पेलोडस ऑन केले जाणार आहेत.
सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान ५ लँग्रेज पॉइंट आहेत. त्यापैकी लँग्रेज पॉइंट १ वर आदित्य एल १ यान पोहोचणार आहे. आदित्य एल १ मिशन पाच वर्ष कार्यरत राहील, अशी अपेक्षा इस्त्रोच्या वैज्ञानिकांना आहे. त्यासाठी आदित्य एल १ यान लँग्रेज पाॉइंट १ पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्याठिकाणी यानाला कमी इंधन लागतं. जर, आदित्य एल १ यान सुस्थितीत राहिलं तर ते १० ते १५ वर्ष देखील काम करु शकतं. चांद्रयान ३ मोहीम यशस्वी ठरल्यानं भारताच्या नागरिकांची आदित्य एल १ मिशनबाबत इस्त्रोकडून अपेक्षा वाढली आहे.