मिळालेल्या माहितीनुसार, एकंदरीत सर्व पुरावे आणि विजय शेट्टी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलिसांचा संशय बळावला. अधिक तपासाअंती चंद्रकांत कांबळे यांच्या बहिणीचा नवरा विजय शेट्टी यानेच गोळी घालून कांबळेंची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. विजय शेट्टी हा आता फरार असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ४ पथके आरोपीचा कसून शोध घेत आहेत.गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या २२ पोलीस अंमलदारांची विविध पथके तयार केली होती.
कांबळे यांना गोळी मारून ठार मारण्याचे उद्देश काय असू शकेल याबाबत वेगवेगळ्या दिशेने सखोल तपास करण्यात आला. त्यानंतर समोर आलेल्या माहितीने पोलीस देखील चक्रावून गेले. चंद्रकांत कांबळे यांची बहिण विमल शेट्टी हिचे आणि तिचे पती विजय शेट्टी यांच्यात वाद आहेत. त्यांचे संयुक्त नावाने असलेले खैरवाडी येथील घर विजय शेट्टी याला विकायचे होते. या घरविक्रीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. विजय रमेश शेट्टी याचे खैरवाडी – रोहा येथील घराची झाडाझडती घेतली असता विजय शेट्टी विरोधात अनेक पुरावे पोलिसांना आढळून आले आहेत.
त्याच्या घरात अनेक बनावट नंबर प्लेट पोलिसांना सापडल्या. तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. विजय शेट्टी याच्यावर यापूर्वीच पनवेल शहरात गोळीबार आणि दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल होता. तसेच पुणे येथे मालमत्तेच्या अपहाराचाही गुन्हा दाखल आहे. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.