नाशिक : शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झालेला असताना आणि लोकसभा निवडणुकीला अगदी काही महिने राहिलेले असताना ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. शिवसेना उपनेते तथा शिर्डी मतदारसंघाचे सह संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांनी राजीनामा दिलेला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रवेशामुळे बबनराव घोलप नाराज होते. शिर्डीतून बबनराव घोलप यांना लोकसभा उमेदवारी हवी होती. परंतु उद्धव ठाकरे वाघचौरे यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल होते. याच कारणास्तव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर महिनाभरानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यांच्यामध्ये शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा देखील समावेश होता. त्यामुळे राज्यातील लोकसभांसाठी उद्धव ठाकरेंकडून लोकसभानिहाय जागांचा आढावा घेतला जात आहे. नाशिकसह शिर्डीची जागा परत मिळवण्यासाठी ठाकरेंनी शिर्डीतून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली. परंतु, शिर्डीच्या जागेवर लढण्यासाठी माजी मंत्री बबनराव घोलप यांनीही तयारी सुरू केली होती. त्यामुळे ठाकरेंकडून वाकचौरेंना बळ दिले जात असतानाच घोलप यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र तरीही ठाकरे वाकचौरे यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल होते.
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडून पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, अशातच ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने घोलप अस्वस्थ झाले होते.
कडवट शिवसैनिक बबनराव घोलप
बबनराव घोलप हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. १९९५ मध्ये भाजप शिवसेना सरकारमध्ये ते मंत्री होते. नाशिकचा देवळाली मतदारसंघ हा राखीव असून या मतदारसंघातून ते पंचवीस वर्षे आमदार राहिले आहे. तर त्यांचे पुत्र योगेश घोलप हे देखील पाच वर्ष शिवसेनेकडून आमदार राहिले आहेत. बबनराव घोलप यांच्या या निर्णयाने आता ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
मतदारसंघात ३० वर्षांपासून पकड, आता लेकीसाठी फिल्डिंग, ठाकरेंचा खास नेता चित्र पालटणार?