मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. गेल्या वर्षी शिवसेना आणि यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, या दोन्ही पक्षातून फुटून आलेल्या मोठ्या गटांनी भाजपला दिलेली साथ यामुळे आगामी निवडणूक रंगतदार ठरणार आहे. जागावाटपापासून तिकिटवाटपापर्यंत सर्वच पातळ्यांवर महायुतीची कसोटी लागणार आहे. केंद्रातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपला महाराष्ट्रातून मोठी ‘पॉवर’ अपेक्षित आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अंतर्गत सर्व्हे केला.दोनच दिवसांपूर्वी गरवारे क्लबमध्ये भाजपच्या सर्व आमदार, खासदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीत खासदार, आमदारांना एक बंद लिफाफा देण्यात आला. त्यात त्यांच्या कामगिरीची माहिती होती. राज्यात भाजपचे लोकसभेचे २३ खासदार आहेत. त्यातील ५ ते ७ खासदारांची कामगिरी सुमार आहे. त्यात सुधारणा न झाल्यास पुढील निवडणुकीत त्यांना तिकीट दिलं जाणार नाही.मुंबईत मोठे बदल? महाजनांच्या मतदारसंघात भाकरी फिरवणार?भाजपच्या काही खासदारांवर त्यांचे मतदार, स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये मुंबईतील खासदार पूनम महाजन, मनोज कोटक यांच्या नावांचा समावेश आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. पैकी तीन जागा भाजपकडे आहेत. यातील दोन जागांवर भाजप भाकरी फिरवू शकतो. महाजन उत्तर मध्य मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ पासून त्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात आणि तगडे उमेदवार ठरू शकतात, असं भाजपचं सर्वेक्षण सांगतं.सोमय्यांना संधी, कोटक यांना धोका?मातोश्रीच्या नाराजीमुळे गेल्या निवडणुकीत भाजप नेतृत्त्वानं किरीट सोमय्यांचं तिकीट कापलं. त्यामुळे सोमय्या माजी खासदार झाले. पण त्यानंतरही ते पक्षासाठी तितकेच सक्रिय राहिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेची युती तुटली. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. कोटक यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह असताना सोमय्या सक्रिय आहेत. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून सोमय्यांना संधी दिली जाऊ शकते.शेट्टींच्या कामगिरीवर पक्ष समाधानीउत्तर मुंबईचे खासदार असलेल्या गोपाळ शेट्टींच्या कामगिरीवर पक्ष समाधानी आहे. मतदारसंघात शेट्टींची कामगिरी उत्तम आहे. त्यांचा जनसंपर्कदेखील दांडगा आहे. त्यांची लोकप्रियताही चांगली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे. २०१४ पासून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here