रायगड: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरला असतानाच याच महामार्गावर प्रवास करणाऱ्या एसटीमध्येच एका महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार घडला आहे. पनवेल-महाड या एसटी बसवर ड्युटी करणाऱ्या चालक वाहकांनी समय सूचकता दाखवून तात्काळ या महिलेला कोलाड आंबेवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. कोलाड आंबेवाडी येथील रुग्णालयात उपचार केल्यावर बाळाची प्रकृती मात्र नाजूक असल्याने या महिलेला अलिबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले आहे. हा प्रकार ९ सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी उशिरा घडला आहे.
इथे ओशाळली माणुसकी! महिलेला प्रसूती कळा सुरू; पोलिसांनी रुग्णालयात नेले, डॉक्टरांचा उपचारास नकार, अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात महाड एसटी आगारातील चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार हे आपली ड्युटी क्रमांक ४७/४८ करीत असताना एका प्रवासी महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. मूळ रोहा आगाराच्या असलेल्या या बसमध्ये त्या महिलेची प्रसूती झाली. आपल्या कर्तव्यावर तत्पर असलेले चालक जाधव आणि वाहक पवार क्षणाचाही विलंब न लावता या महिलेला कोलाड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. बाळ आणि आई दोघेही सुखरूप दवाखान्यात पोहोचल्याने बसमधील अन्य प्रवाशांनीही त्यांचे आभार मानले.

चालक आणि वाहकाने या महत्त्वाच्या प्रसंगी दाखवलेल्या समय सूचकतेबद्दल रोहा तसेच महाड एसटी आगार प्रशासनाकडून त्यांचं कौतुक करण्यात आले आहे. सुशीला रवी पवार (रा. रुद्रोली) असे गरोदर महिलेचे नाव आहे. पनवेल महाड एसटी शनिवारी दुपारी जेवण केल्यानंतर पेण वडखळ येथून कोलाडकडे येण्यासाठी निघाली. या एसटीने प्रवास करीत असताना ही एसटी बस सायंकाळी ६ वा. च्या सुमारास कोलाड जवळ असलेल्या पुई महिसदरा पुलावर असलेल्या खड्ड्यातून मार्ग काढत होती. यावेळी अचानक त्या महिलेच्या पोटात दुखू लागले. तिला प्रसूती कळा सुरु झाल्या असल्याचे लक्षात येताच एसटी चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार यांनी प्रसंगावधानाने ही एसटी बस आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अंतरवाली सराटीतील जखमींवर मुंबईत उपचार होणार, अर्जुन खोतकरांनी घेतली भेट

मात्र या घटनेनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील असलेले खड्डे याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येत्या काळात अजून कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागल्यानंतर संबंधित नेतेमंडळी आणि ठेकेदार एजन्सी यांचे डोळे उघडणार आहेत का ?असा संतप्त सवाल आता प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here