लखनऊ: प्राण्यांना लळा लावल्यावर त्यांच्याकडूनही निर्वाज्य प्रेम मिळतं. एक वेळ माणूस उपकार विसरेल, पण प्राणी उपकारांची जाण ठेवतात. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. भीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील माकडाची एका शेतकऱ्याशी गट्टी जमली. त्यांची दोस्ती अनोखी होती. शेतकऱ्याचं निधन झाल्यानंतर माकड त्याच्या घरी पोहोचलं. आपला सखा आपल्याला सोडून गेला याचं दु:ख त्याच्या डोळ्यात दिसत होतं. जमिनीवर लोळण घेत त्यानं त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.गोंधिया गावात चंदन वर्मा नावाचे शेतकरी राहायचे. जंगलाजवळ त्यांचं शेत होतं. शेतात ते जेवायला बसायचे, तेव्हा एक माकडं त्यांच्या जवळ येऊन बसायचं. चंदन वर्मा मोठ्या प्रेमानं त्याला जेवू घालायचे. हळूहळू दोघांची घट्ट मैत्री झाली. मात्र त्या माकडाला चंदन वर्मांचं घर माहीत नव्हतं. काही महिन्यांपूर्वी चंदन कुमार यांना अर्धांगवायूचा झटका आला. आजारी असल्यानं त्यांना शेतात जाता येईना. प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं.चंदन वर्मांच्या निधनानंतर त्यांचे नातेवाईक, मित्र घरात जमले. घरावर शोककळा पसरली. याच दरम्यान माकड तिथे पोहोचलं. त्यानं चंदन वर्मांच्या पार्थिवावरील चादर दूर केली. चेहरा पाहताच ते रडू लागलं. इकडे तिकडे बसून ते अश्रू ढाळत होतं. बराच वेळ ते चंदन यांच्या पार्थिवाशेजारी बसून रडत होतं. माकडाला पाहून नातेवाईक, कुटुंबीय घाबरले. पण माकडानं कोणालाच इजा केली नाही. ते केवळ चंदन यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होतं. त्याचे डोळे ओलावले होते.चंदन कुमार यांच्या अंत्यदर्शनाला गेलेल्या काही ग्रामस्थांनी माकडाचा व्हिडीओ टिपला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. चंदन कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत माकड थांबलं. ज्यानं आपापल्या लळा लावला, डब्यातलं जेवण मोठ्या मायेनं खाऊ घातलं, त्याच्या अंत्यदर्शनाला, अंत्यसंस्काराला माकड हजर होतं. आपला सोबती हरवल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं. माकडाची अवस्था पाहून उपस्थितांपैकी अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here