भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, ११ सप्टेबर रोजी नांदेड दौऱ्यावर येणार होते. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या भाजप खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याशी ते संवाद साधणार होते. तसेच नायगाव येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार होता. स्थानिक भाजपाकडून तयारी देखील करण्यात आली होती. नायगाव येथे त्यांच्या स्वागताचे बॅनर लागले होते. मात्र नायगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांनी बावनकुळे यांचा विरोध केला होता. उपोषणकर्त्यांचा विरोध पाहता त्यांनी आपला नियोजित नांदेड दौरा रद्द केला आहे.
रविवारी नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि लातूरचे खासदार सुधाकर श्रीगांरे यांच्या हस्ते लोहा तालुक्यात विकास कामाचे भूमिपूजन होणार होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी देखील मराठा समाजाच्या आक्रमकतेमूळे रात्रीतून कार्यक्रम रद्द केला आहे. विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
यापूर्वी मराठा समाजाकडून काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार अमर राजूरकर यांना घेराव घालून मराठा आरक्षणाबाबत जाब विचारण्यात आला आहे. त्यानंतर शनिवारी अशोक चव्हाण यांना देखील आंदोलनकर्त्यांनी घेराव घालत निषेध केला आहे. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळेच राजकीय पक्षातील नेते आपले कार्यक्रम रद्द करत असल्याचे दिसत आहेत.
सोमवारी नायगाव बंदचे आवाहन
सकल मराठा समाजा तर्फे रविवारी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून साखळी उपोषण, आमरण उपोषण केले जात आहे. हदगाव, कंधार, अर्धापूर, नायगाव यासह अनेक तालुक्यात आंदोलने सुरु आहेत. दरम्यान सोमवारी नायगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.