राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार यांचे पक्षातील समर्थकांनी पुण्यात जोरदार स्वागत केले. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरापासून रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री व पालकमंत्री पदाबाबतच्या चर्चांवर भाष्य केले. ‘विधानसभेत १४५ ही ‘मॅजिक फिगर’ गाठणाऱ्या पक्षाचा नेताच मुख्यमंत्री होतो. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांनी हा आकडा गाठल्याने ते मुख्यमंत्री झाले. बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही. लोकांची कामे करत राहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. बहुजनांच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विचारणा केली असता, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. ‘आरक्षणाबाबत वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्यामुळे कोणालाही न दुखावता, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढण्याची सर्वांची मागणी आहे. आधीच्या सरकारमध्ये सत्तेत असताना आम्ही त्यासाठी प्रयत्न केला. परंतु, तो टिकला नाही. आंदोलकांच्या मागण्यांकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. परंतु, इतर समाजाला धक्का न लागता त्यावर तोडगा निघाला पाहिजे. चर्चेतून हा मार्ग निघू शकतो,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल
अजित पवार यांच्यासमवेत महायुतीत सहभागी झालेल्या आमदारांना निलंबित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्र दिले आहे. त्याबाबत विचारणा केली असता, पवार म्हणाले, ‘या संदर्भात आयोगाकडे वेगवेगळी पत्रे गेली आहेत. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आयोग योग्य निर्णय घेईल.’
शिंदेवाडीत जंगी स्वागत
सातारा : जिल्ह्यातील शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठा पुष्पहारासह फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी अजितदादांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच शरद पवार आल्यानंतर त्या गाडीत सारथी झालेले आमदार मकरंद पाटील यावेळी अजित पवार यांच्या गाडीचे सारथी झाले होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. आज (दि. ११) कोल्हापुरात अजित पवारांची सभा होणार आहे.