म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईप्रमाणेच राज्याच्या विविध भागांत ताप, सर्दी, खोकला, डोळे येण्याची साथ आणि इन्फ्लुएन्जा यामुळे सर्वसामान्य बेहाल आहेत. पावसाची उघडीप, वातावरणामधील बदल आणि विषाणू संसर्गासाठी पोषक अशा वातावरणामुळे व्हायरलसह इतर स्वरूपाच्या तापाचा जोरही वाढत आहे.

करोना संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्याही राज्यात वाढत असून, ९ सप्टेंबरपर्यंत उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या २०२ इतकी नोंदवण्यात आली आहे. घरगुती विलगीकरणामध्ये १८० रुग्ण असून, रुग्णालयामध्ये २२ रुग्ण दाखल आहेत. अतिदक्षता विभागामध्ये १२ रुग्णांना दाखल करण्यात आले असून, आयसीयूमध्ये त्यापैकी दहा रुग्ण उपचार घेत आहेत. १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात ११६ रुग्णांची नोंद झाली होती. तर २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या आठवड्यात १९५ असलेली संख्या ४ ते १० सप्टेंबर या कालावधीमध्ये २१४ इतकी झाली आहे. मुंबईमध्ये करोनाचे ११० रुग्ण असून, ठाण्यात साठ रुग्ण आढळून आले आहेत.

Navi Mumbai: नवी मुंबईत साथीचे आजार बळावले; ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढले

१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एच१एन१ या संसर्गाच्या ३२२ रुग्णसंख्येची नोंद झाली असून, एच३एन२ या संसर्गाचे ११९६ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. आत्तापर्यंत या दोन्ही प्रकारचे १५१८ रुग्ण आढळून आले आहेत. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीमध्ये इन्फ्लुएन्जाची ५३७ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. एच३एन२च्या ५१८ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. या दोन्ही प्रकारांतील १०५५ रुग्ण आढळून आले असून, पंधरा जणांना स्वाइन फ्लूमुळे प्राण गमवावे लागल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येते. जानेवारी ते मे या कालावधीच्या तुलनेमध्ये १ जून ते ९ सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येची अधिक नोंद झाली आहे. या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी राज्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. या आजाराचे मृत्यू नेमके कोणत्या कारणांमुळे झाले याचा अभ्यास करण्यासाठी मृत्यू विश्लेषण समिती स्थापन करण्यात आली आहे.

Mumbai News: मुंबईत पावसाची उघडीप, विषाणूंचा फैलाव वाढला; साथीच्या आजारांबाबत डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

डोळ्यांची साथ नियंत्रणात नाही

डोळे येण्याची साथ अद्याप नियंत्रणात आली नसून, राज्यात ५ लाख ५० हजार ४४२ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. पुणे येथे ५२,५२३ तर बुलढाणा येथे ४९,८९३, जळगावमध्ये २९,८५६ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये ६९३५ जणांना हा त्रास झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here