‘जगातील कमकुवत देशांवर होणारे हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आमच्या देशाने हे आर्थिक योगदान दिले आहे. जी २० शिखर परिषदेच्या तिसऱ्या व ‘एक भविष्य’ या सत्रात सुनक यांनी वरील घोषणा करून ब्रिटनच्या प्रतिबद्धतेची पूर्तता केली आहे,’ असे भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांनी नमूद केले.
दरम्यान, याच परिषदेच्या निमित्ताने झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनक यांच्यासमोर ब्रिटनमधील खलिस्तान समर्थकांचा मुद्दा उपस्थित केला. खलिस्तानच्या मुद्द्यावर सुनक यांनी, ब्रिटन हिंसाचार खपवून घेणार नाही असे याआधीच म्हटले होते. २०२२च्या ऑक्टोबरमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
अक्षरधाम मंदिरात पूजा अर्चा
ऋषी सुनक रविवारी सकाळी पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह भर पावसात दिल्लीतील प्रसिद्ध अक्षरधाम मंदिरात पोहोचले. या वेळी सुनक दाम्पत्याने भगवान स्वामी नारायणाचे दर्शन घेतले व पूजा केली. यमुना नदीच्या संरक्षित पात्रात वाजपेयी सरकारच्या काळात या भव्य मंदिराला परवानगी मिळाली होती. ‘सुनक दाम्पत्याने अतिशय भक्तिभावाने पूजा केली. आम्ही त्यांना अक्षरधाम मंदिर परिसर दाखवला आणि मंदिराची आठवण व्हावी म्हणून भेटवस्तूही दिली. सुनक दाम्पत्य पूर्णपणे धर्मनिष्ठ आहे,’ असे अक्षरधाम मंदिरात पूजा केल्याचे सांगून मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे यांनी सांगितले. सुनक यांनी शुक्रवारी भारतात पोहोचल्यावर, ‘एक सश्रद्ध हिंदू असल्याचा आपल्याला अभिमान आहे,’ असे म्हटले होते.