सकाळी सहाच्या सुमारास जावेद यांची पत्नी शमा परवीन यांना जाग आली. घरातील खोल्यांचे दरवाजे उघडे असून सामान अस्ताव्यस्त पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांचं लक्ष छतावरील दरवाज्याकडे गेलं. ते दारही उघडं होतं. घरात चोरी झाल्याचं परवीन यांच्या लक्षात आलं.
छतावर जाण्याचा रस्ता खुला असल्याचं त्यांनी पाहिलं. त्या वेगानं छतावर गेल्या. त्यावेळी तिथलं दृश्य पाहून त्यांनी किंकाळी फोडली. परवीन यांचा आवाज ऐकून जावेदही छतावर गेले. तेव्हा त्यांना तिथे एक तरुण विजेच्या तारेला चिकटलेला दिसला. तो मृत्यूमुखी पडला होता. पती-पत्नीची किंकाळी ऐकून शेजारीही धावले. मृत तरुणाला विजेच्या तारांपासून वेगळं करण्याचं धाडस कोणीही करु शकलं नाही. कारण त्या तारांमधून ११ हजार व्हॉल्टचा वीजप्रवाह सुरू होता.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी वीज पथकाला घेऊन गाव गाठलं. तरुणाला तारांपासून वेगळं करण्यात आलं. रात्रीच्या सुमारास तरुणानं जावेद यांच्या घरात चोरी केली. त्यानंतर तो छतावरुन पोबारा करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याच सुमारास तो विजेच्या तारेच्या संपर्कात आला आणि जीव गमावून बसला.
पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्याकडे जावेद यांच्या घरातून चोरलेले चार मोबाईल, घड्याळ, सोन्या चांदीचे दागिने आणि अडीच हजार रुपये सापडले. त्याच्याकडे एक ओळखपत्र सापडलं. त्यावर इब्राहिम असं नाव आहे. तो देहराचा रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली आहे.