बंगळुरु : जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडीएसचे सर्वेसर्वा आणि भारताचे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला आहे. गेले अनेक दिवस तळ्यात मळ्यात सुरु असताना देवेगौडांनी भाजप आणि जेडीएस एकत्र निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनीही वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. रविवारी बंगळुरुमध्ये जेडीएसच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना एचडी देवेगौडा म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. एचडी कुमारस्वामी आणि पंतप्रधान आपापसात चर्चा करुन कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे सूत्र ठरवतील, असेही ते म्हणाले.देवेगौडा यांनी आपल्या प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपल्या भाषणात, त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले की आपण इतके मोठे धर्मनिरपेक्ष नेते असूनही काँग्रेस आणि ‘इंडिया’च्या इतर नेत्यांनी या आघाडीचा भाग होण्यासाठी त्यांच्याशी साधा संपर्कही साधला नाही.आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष राजकीय समीकरणे आखण्यात व्यस्त आहेत. एकीकडे इंडिया आघाडीची पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी आहे, तर दुसरीकडे कर्नाटकातील पराभवानंतर भाजपही राज्याकडे गांभीर्याने पाहत आहे. त्यामुळे भाजप आणि जेडीएस कर्नाटकात युती करून नव्या युद्धासाठी तयार झाल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here