गांधीनगर: वाईट कर्माचं फळ वाईटच असतं. जे पेराल तेच उगवतं असं म्हणतात. अनेकदा वाईट कर्माचं फळ अगदी तिथल्या तिथे काही मिनिटांमध्ये मिळतं. ट्रॅक्टर चोरी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला. शोरुमच्या परिसरात उभा असलेला ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न एक जण करत होता. तितक्यात ट्रॅक्टर सुरू झाला आणि तो चोराच्या अंगावर चढला. घटना गुजरातच्या अरवल्लीतील मोडासा शहरात घडली. रात्रीच्या सुमारास एक जण ट्रॅक्टर चोरी करण्यासाठी आला होता. तो ट्रॅक्टरच्या डाव्या बाजूला असलेल्या दोन चाकांमध्ये उभा असताना ट्रॅक्टर अचानक सुरू झाला. चोराचा पाय ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली आला. त्यानं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॅक्टरच्या ताकदीपुढे त्याचा निभाव लागला नाही. पाहता पाहता चोरटा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. भलमोठं चाक त्याच्या अंगावरुन गेलं.ट्रॅक्टरचा मागील टायर चोराच्या शरीरावरुन गेल्यानंतरही चोरट्याला गंभीर इजा झाली नाही. त्यानं कसंबसं स्वत:ला सावरलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली. चाक अंगावरुन गेल्यानंतर चोर उठून उभा राहिला आणि सावरत सावरत ट्रॅक्टरच्या दिशेनं गेला. चालू लागलेला ट्रॅक्टर काही मीटर पुढे गेला होता. ट्रॅक्टर आपोआप चालत होता. चोरटा त्या ट्रॅक्टरवर चढला आणि पळून गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here