नाशिक: येथील पर्वतगडावर चढाई करत असताना कोडोली येथील शिवदुर्ग ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य राजेंद्र रामभाऊ बिचकर (वय ५८) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पर्वतगड चढण्यास सुरुवात करत असताना पायथ्यावरच बिचकर यांना चक्कर आली, यावेळी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या घटनेला सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक परिसरातील पाच दिवसांत आठ गडांची मोहीम सर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुणे आणि मुंबई येथील ६० गिर्यारोहक नाशिक येथे आले होते. त्यामध्ये कोडोली येथून राजेंद्र बिचकर आणि अजित गुरव हे दोघे शनिवारी नाशिक येथे आले शनिवारी पहाटे पाच वाजता नाशिक येथील पेनगिरीगडावर चढाई करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहीम सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण केली. त्यानंतर ११ वाजता पर्वतगड चढण्यास सुरुवात करण्यात आली.
यावेळी गडाच्या पायथ्यालाच बिचकर यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांना उपचार मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अजित गुरव यांनी नाशिक येथून रविवारी पहाटे बिचकर यांचा मृतदेह कोडोली येथे आणला. सकाळी आठ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिचकर यांनी कोडोली शिवदुर्ग ट्रेकिंग ग्रुपची स्थापना करून कोडोलीतील अनेक तरुणांना सोबत घेऊन अनेक गडकोट मोहिमा यशस्वी केल्या होत्या. त्यांनी सुमारे ३२० गड, किल्ले, पर्वत यशस्वीपणे सर केले होते.
सध्या ते रंगकाम ठेकेदार म्हणून व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूने बिचकर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.