चेन्नई: विचित्र अपघातात सात महिलांचा दुर्दैवी शेवट झाला आहे. तमिळनाडूच्या तिरुप्पात्तूर जिल्ह्यात सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बंगळुरू-चेन्नई महामार्गावर हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुप्पात्तूर जिल्ह्यात असलेल्या अंबूर गावातील ४५ जण ८ सप्टेंबरला दोन व्हॅनमधून बंगळुरुला फिरायला गेले होते. सोमवारी सकाळच्या सुमारास सगळे जण गावी परतत होते. त्यावेळी एका व्हॅनचा टायर पंक्चर झाला. पंक्चर काढण्यासाठी चालकानं व्हॅन बाजूला घेतली. रस्त्याच्या कडेला व्हॅन थांबवून चालक टायर बदलत होता.चालक टायर बदलत असल्यानं प्रवासी खाली उतरले. ते व्हॅनच्या पुढे, रस्त्याच्या कडेला बसले. तितक्यात मागून आलेल्या भरधाव लॉरीनं व्हॅनला धडक दिली. व्हॅन समोर बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर चढली. व्हॅनखाली प्रवासी चिरडले गेले. यामध्ये सात महिलांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. जखमींमध्ये लॉरी चालक आणि क्लिनरचा समावेश आहे.अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील गस्ती पथक आणि नेत्रामपल्ली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केलं. पथकांनी सात महिलांचे मृतदेह तिरुप्पत्तूर आणि वनियामबाडीतील सरकारी रुग्णालयात पाठवले. नेत्रामपल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
Home Maharashtra ज्या व्हॅननं फिरायला गेल्या, तिच्याच खाली चिरडून ७ महिलांचा शेवट; हायवेवर विचित्र...