मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा १४ वा दिवस आहे. सरकारने यासंबंधीचा अध्यादेश तर काढलाय पण त्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर काहीच विचार न झाल्याने किंवा तशी सुधारणा न केल्याने त्यांनी आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, त्यांनी सरकारला दिलेला ४ दिवसांचा अल्टिमेटम संपल्याने आता त्यांनी ‘आरपार’ची भूमिका घेतली आहे.
तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावूक आवाहन केलं. “आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणकाच तसा आहे. पण जो बोलत नाही त्याला का विनाकारण लक्ष्य करायचं? मग तो कुणी का असेना… मात्र, जे सत्तेत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा हा त्यांना आमचा संदेश आहे. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. अजित पवार कमी पडलो असं म्हणाले होते. आता आम्ही त्यांना विनंती करतो, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन आरक्षणाचा विषय लावून धरावा. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर त्यांच्यासमोर नतमस्तक होईन. अगदी नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही”.
अजित पवार यांनीच सर्व पक्षीय नेते गोळा करून गरिबांच्या लेकरांना न्याय द्यावा
“अजित पवार यांना आम्ही विनंती करतो, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन आरक्षणाचा विषय लावून धरावा. आम्हा गोरगरिबांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवावा. मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांनी गोरगरिब मराठ्यांचं कल्याण करावं”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी अजित पवार यांना केलं.
मुख्यमंत्री शिंदे यांचे पत्र (लिफाफा) घेऊन खोतकरांनी शनिवारी जरांगे यांची भेट घेतली, त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे उपोषणावर ठाम राहिले. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही आमचा आक्रोश घेऊन बैठकीला जा. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर तुमच्यासमोर नतमस्तक होईन. तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही. अजित पवार यांनीच सर्व पक्षीय नेते गोळा करून गरिबांच्या लेकरांना न्याय द्यावा”
अजित पवार काय म्हणाले?
मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक बोलावली आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असा मला विश्वास आहे. सरकार आंदोलकांच्या मागण्यांकडे कानाडोळा करत नाही. परंतु, आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लागता निर्णय झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. मला विश्वास आहे की सरकार यावर तोडगा काढेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.