ठाणे : बाळकुम परिसरातील रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीमधील सर्व्हिस लिफ्ट कोसळून रविवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेतील मृत कामगारांची संख्या आता सात झाली आहे. उपचारादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुर्घटनाग्रस्त लिफ्ट गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त असल्याची धक्कादायक बाब या घटनेनंतर समोर आली आहे. या प्रकरणी एका मजुराच्या तक्रारीनंतर लिफ्ट ठेकेदार, मजूर ठेकेदारावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेच्या दिवशीही लिफ्ट वारंवार बंद पडत होती, असे तक्रारदार मजुराने सांगितले. त्यामुळे वेळीच लिफ्टची योग्य दुरुस्ती झाली असती तर सात मजुरांचे प्राण निश्चितच वाचले असते.

बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल कॉम्प्लेक्समधील आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून लिफ्टने सहा कामगारांसह एक लिफ्ट ऑपरेटर खाली येत होते. यावेळी लिफ्ट खालील भाग पूर्णपणे निखळला. त्यातून सर्व कामगार खाली कोसळून त्यांच्यावर लिफ्टचा लोखंडी सांगाडा कोसळला. या दुर्घटनेत जागीच पाच आणि उपचारादरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव व सहायक पोलीस आयुक्त अनिल देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मजुरांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणी दशरथकुमार दास या मजुराने दिलेल्या तक्रारीनुसार लिफ्ट, मजूर ठेकेदार आणि इतरांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त लिफ्ट तीन महिन्यांपासून नादुरुस्त असूनही तिचा वापर सुरु असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दुरुस्ती करून ही लिफ्ट बांधकाम साहित्य, मजुरांची ने – आण करण्यासाठी वापरात आणली जात होती. दुर्घटनेच्या दिवशीही लिफ्ट मोठ्याने आवाज करत थांबून चालत होती. त्यानंतरच हा अपघात घडल्याचे तक्रारदार मजूर दास याने पोलिसांना सांगितले. ही लिफ्ट सागर एलिव्हेटर कंपनीची असून या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Lift Crash: पायाखालचा भाग निखळला, स्फोटासारखा प्रचंड आवाज अन् लिफ्टचा लोखंडी सांगाडा कामगाराच्या अंगावर कोसळला

काही दिवसांपूर्वीच लिफ्टला सुरक्षा प्रमाणपत्र

काही दिवसांपूर्वीच लिफ्ट सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या प्रत्येकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तसेच लिफ्टला सुरक्षा प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे.
– संजय भोईर, स्थानिक माजी नगरसेवक

ठाण्यात मोठी दुर्घटना: ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली, ६ कामगारांचा मृत्यू

विकासक, पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

ठाण्यात नगररचना विभागाचा आधीच भोंगळ कारभार असून अनधिकृत बांधकामे जोमात सुरू आहेत. त्यातच लिफ्ट दुर्घटनेत सात कामगारांच्या दुर्देवी मृत्यूप्रकरणी विकासक आणि पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा.
– केदार दिघे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here