राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे की नाही? असा प्रश्न निवेदक अवधूत गुप्ते यांनी विचारला असता, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काय आहे व्हिडिओ?
“एक वेळ कुटुंबातील माणसं साथ सोडतील, पण त्यांच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत” असं म्हणत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवरील फोटो ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर दाखवण्यात आले. त्याच वेळी सुप्रियाताई अजितदादांचं औक्षण करतानाचा व्हिडिओ लागला आणि सुप्रिया सुळेंच्या अश्रूंचा बांध फुटला. अजितदादांसोबतच्या आठवणी डोळ्यात दाटून आल्या, अन् त्यांच्या नकळत अश्रूंवाटे ओघळल्या. सुप्रिया सुळे डोळ्याला पदर लावून रडू लागल्या. यावेळी ‘फुलों का तारों का सब का कहना है, एक हजारों में मेरी बहना हैं’ हे गाणं प्रोमोमध्ये बॅकग्राऊण्डला ऐकू येतं
“तुम्ही कार्यक्रमाच्या आधी म्हणाला होतात, की तुम्ही आमच्या भावना सगळ्यांच्या समोर काढू शकत नाहीत, आता काय सांगाल?” असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी सुप्रिया सुळेंना विचारल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं.
पाहा व्हिडिओ
अजित पवार यांनी फारकत घेत सत्तेत सहभाग घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच रक्षाबंधन आले. अजित पवार यांना राखी बांधली का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावेळी बोलताना माझा मावस भाऊ आणि श्रीनिवास पाटील यांना मी राखी बांधली पण, दादा त्या दिवशी उपस्थित नव्हता असे सुळेंनी सांगितले होते. त्यामुळे या हुकलेल्या रक्षाबंधनाच्या आठवणींनीच सुप्रिया ताई हळव्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.