नवी मुंबई : मुंबईतील हार्बर मार्गावरील प्रवाशांना २२ दिवस समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कारण, पनवेल स्थानकावर गाड्या रद्द होणार असल्याची माहिती आहे. जेएनपीटीपर्यंत समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी काम सुरू आहे. त्यासाठी दोन ट्रॅकही पनवेलमधून जात आहेत. १८ ऑगस्टपासून या ट्रॅकचे काम सुरू झाले असून दररोज रात्री सुमारे ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येत होता. आता पनवेल यार्डात काही जोडणीचे काम केले जाणार असून, त्यामुळे ब्लॉकचा कालावधी वाढवून रात्री ५ तास करण्यात येत आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता असेल. त्यानंतर पनवेलच्या गाड्यांना बेलापूरलाच थांबा देण्यात येणार आहे.
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे तब्बल ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, आता महाराष्ट्रात ३० टक्के काम सुरू झाले आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, पनवेल स्थानकावर डीएफसीसाठी दोन ट्रॅक तयार करण्यात येत असून, त्यासाठी ४५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. २ ऑक्टोबरपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सकाळी ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील अशी माहिती आहे.
स्थानिक भागांना बसणार फटका…
स्थानिक भागांना बसणार फटका…
सोमवारपासून सीएसएमटी ते पनवेल ही शेवटची लोकल २२:५८ वाजता असेल. यानंतर सीएसएमटी ते पनवेल ही लोकल बेलापूरपर्यंत २३:३०, २३:५२, ००:१३ आणि ००:४० वाजता धावेल. ठाणे ते पनवेल डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील शेवटची लोकल २३:३२ वाजता असेल.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे (DFC) लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मालगाड्यांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर व्हावा यासाठी डीएफसीचे काम अतिशय वेगाने केले जात आहे. जेएनपीटी ते दादरी या १५०६ किमी लांबीच्या कॉरिडॉरमधील मुख्य १०९ किमी लांबीचा मार्ग वैतरणा ते जेएनपीटी तयार केला जात आहे. हा कॉरिडॉर पनवेल स्टेशनमधून जाणार आहे, त्यामुळे पनवेल स्टेशनवर DFC साठी दोन लाईन (अप-डाउन) बांधण्याचे काम सुरू आहे.