कोलंबो : कुलदीप यादवच्या फिरकीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळेच भारताला पाकिस्तावर २२८ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला. या विजयासह भारताने आशिया कप स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीची धुलाई केली आणि त्यानंतर कुलदीप यादवचे वादळ पाहायला मिळाले. कोहली आणि राहुल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला आणि त्यांना सामना जिंकण्याची एकही संधी दिली नाही.जयप्रीस बुमराने यावेळी पाकिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानंतर हार्दिक पंड्याने बाबर आझमला क्लीन बोल्ड केले आणि भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर कुलदीप यादव नावाचे वादळ मैदानात घोंघावले. कारण कुलदीपने आपल्या फिरकीच्या जोरावर यावेळी पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगलेच नाचवलेय कुलदीपने यावेळी पाकिस्तानचा अर्धा संघ गारद केला आणि त्यांचे कंबरडे मोडले. कुलदीपच्या खेळीचे उत्तर यावेळी पाकिस्तानकडे नसल्याचे पाहायला मिळाले.