मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमचे सरकार काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींमध्ये जी भीती आहे की त्यांचे आरक्षण कमी होणार, मात्र अशाप्रकारे सरकारचा कोणताही हेतू नाही. ओबीसी समाजाने गैरसमज करून घेऊ नयेत. दोन समाज समोरासमोर यावेत, असा निर्णय राज्य सरकार कदापि घेणार नाही. कोणत्याही समाजाच्या नेत्याने काहीही विधान करताना अन्य समाज दुखावणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे.’
‘लोकशाहीत एखादे उपोषण करणे, प्रश्न लावून धरणे याला मान्यताच आहे. लोकशाहीची ती पद्धत आहे; परंतु असे प्रश्न सोडवण्यासाठी काय मार्ग काढता येईल यावर विचार करायला हवा. सरकारला कायद्याचा, सर्वोच्च न्यायालयाचा विचार करावा लागतो. आम्ही आरक्षण दिले तरी ते कायद्याच्या चौकटीवर टिकले पाहिजे. नाहीतर आम्ही एखादा निर्णय घेतल्यास समाज म्हणेल की आमची फसवणूक केली. मराठा आरक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, मला विश्वास आहे की सर्वांनी सकारात्मक विचार केला तर समाजाचे भले होईल,’ असेही फडणवीस म्हणाले.
‘सर्व मागण्यांचा एकत्रित विचार करणार'”
‘सरकार आणि विरोधी पक्षाने मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. आजच्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे, की कोणत्या मार्गाने पुढे जाता येईल. मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आले आहेत. इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या त्याच मागण्या आहेत. या सर्व मागण्यांचा नीट एकत्रित विचार करून यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा विचार केला जाईल,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.