मुंबई : माहीम किल्ल्यावरील झोपड्यांची अतिक्रमणे हटविल्यानंतर आता किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामावर मुंबई महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुरातन वास्तुविशारद विकास दिलावरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किल्ल्याचा पुरातन काळाशी साधर्म्य असणारा चेहरामोहरा अधिकाधिक उलगडण्याचा प्रयत्न या सौंदर्यीकरण/सुशोभीकरणात करण्यात येणार आहे.

सागरी आरमाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा माहीम किल्ला एकेकाळी मुंबईच्या समुद्रीमार्गाचा संरक्षक शिलेदार मानला जात होता. एक हजारहून अधिक वर्षांचा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला पाहण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक येतात. मात्र किल्ल्यावरील झोपड्यांमुळे किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचत होती. तसेच अस्वच्छताही निर्माण झाली होती. त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. किल्लेअभ्यासक, पर्यावरणवादी संस्थांनी याबाबत पालिकेचे वारंवार लक्ष वेधल्यानंतर अखेर या किल्ल्यासह मुंबईतील इतर समुद्री किल्ल्यांच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला.

महत्त्वाची बातमी; ब्रिटिशकालीन जलाशयाच्या कामाला सुरुवात, दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा वाढणार
माहीम किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यात किल्ल्यावरील झोपड्या हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारणत: १९७०पासून किल्ल्यावर झोपड्यांचे अतिक्रमण सुरू झाले होते. राज्य सरकारच्या सन २०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या धोरणानुसार या झोपड्यांचे आधी पर्यायी जागेत पुनर्वसन करण्यात आले. अन्य बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून संरक्षक कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर किल्ल्याला नवी झळाळी देण्यासह किल्ल्याची पुरातन वास्तू कशी होती, बुरूज, कोट, भिंती, त्यावेळी किल्ल्यात असलेल्या वास्तू या जुन्या काळाप्रमाणेच दिसाव्यात याचा विचार सौंदर्यीकरणात केला जाणार आहे.

किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी दिलावरी यांच्याकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी किल्ल्याचा संपूर्ण अभ्यास केला जाणार आहे. सौंदर्यीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर माहीम चौपाटी सर्वप्रथम स्वच्छ करण्यात आली आहे. किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाल्यावर येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावरून वांद्रे-वरळी सी-लिंक न्याहाळता येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.

जलमार्गाचा द्वाररक्षक

मुंबईत असलेल्या किल्ल्यामध्ये सर्वांत पुरातन म्हणून माहीमचा किल्ला ओळखला जातो. मुंबईच्या बेटांना मुख्य भूमीपासून विभक्त करणाऱ्या महिकावती-माहीम खाडीच्या मुखावर सन ११४०मध्ये प्रतापबिंब राजाने हा किल्ला बांधला. तसेच आपली राजधानीही तेथेच वसवली. महिकावतीमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांना बोलावून व्यापार, उदीम, शास्त्र व संस्कृतीची बिजे या राजाने मुंबई बेटावर रूजवली. हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड ऑगियर याने सध्या अस्तित्वात असलेला किल्ला नव्याने बांधला. मुंबईच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्याना जोडणाऱ्या व माहीमच्या खाडीचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्याला जलमार्गाचा द्वाररक्षक म्हणून ओळखले जात असे.

मुंबईत एकूण ११ किल्ले

मुंबई बेटावर वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा सायन टेकडी, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, सेंट जॉर्ज आणि बॉम्बे फोर्ट यांसह एकूण ११ किल्ले आहेत. यापैकी बहुसंख्य किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. यातील वरळी किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सध्या सुरू आहे, तर शिवडी किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai News: बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस, पण मुंबईत खड्ड्यांचे विघ्न कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here