‘इम्फाळ’ ही नौदलाच्या ताफ्यात दाखल असलेल्या ‘आयएनएस विशाखापट्टणम’ या विनाशिका श्रेणीतील युद्धनौका आहे. या श्रेणीतील ‘विशाखापट्टणम’ व ‘मोर्मुगाव’ या दोन युद्धनौका याआधीच ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ‘इम्फाळ’ यांतील तिसरी युद्धनौका आहे. तर चौथी युद्धनौका ‘सुरत’ असून तिच्या सध्या समुद्री चाचण्या सुरू आहेत. या ‘प्रकल्प १५ ब’मधील युद्धनौका आहेत.
‘इम्फाळ’ ची उभारणी माझगाव डॉकने १९ मे २०१७ रोजी सुरू केली होती. २० एप्रिल २०१९ ला युद्धनौकेचे जलावतरण झाले. २८ एप्रिल २०२३ ला युद्धनौकेने समुद्री चाचण्या सुरू केल्या. यानंतर आता ३१ ऑक्टोबरला युद्धनौकेचे ‘कमिशनिंग’ (ताफ्यात दाखल करून घेण्याचा कार्यक्रम) होत आहे. या श्रेणीतील जलावतरणानंतर ही सर्वांत कमी वेळेत ताफ्यात दाखल होणारी युद्धनौका असेल. याआधी ‘आयएनएस विशाखापट्टणम’चा जलावतरण ते कमिशनिंग कालावधी ६ वर्षे व पाच महिने व मोर्मुगावचा हा कालावधी ५ वर्षे दोन महिने होता. यानंतर आता ‘इम्फाळ’ जलावतरणानंतर अडीच वर्षांत ताफ्यात दाखल करून घेतली जात आहे.
‘प्रकल्प १५ ब’ याप्रमाणे
नौादलाने विनाशिका उभारणीसाठी ‘प्रकल्प १५’ हाती घेतला आहे. त्यामधील पहिल्या तीन युद्धनौका १९९८ ते २००१ दरम्यान ताफ्यात आल्या. ‘आयएनएस दिल्ली’ श्रेणीतील त्या युद्धनौका होत्या. यानंतर ‘प्रकल्प १५ अ’मध्ये ‘आयएनएस कोलकाता’ श्रेणीत तीन युद्धनौका होत्या. आता या चार युद्धनौका ‘प्रकल्प १५ ब’ अंतर्गत तयार झाल्या आहेत. ‘प्रकल्प १५ अ’ या ‘सेमी स्टेल्थ’ होत्या.
अशी असेल ‘इम्फाळ’
वजन : ७४०० टन
लांबी : १६३ मीटर
रुंदी : १७.४ मीटर
खोली : ६.५ मीटर
कमाल वेग : ३३.५ नॉट (ताशी ६२ किमी)
कमाल क्षमता : ८ हजार किमी (४५ दिवस)
कर्मचारी : ३०० (५० अधिकारी व २५० नौसैनिक)
शस्त्रसामग्री : ३२ हवेत मारा करणारी बराक क्षेपणास्त्रे, १६ जहाजांवर मारा करणारी ब्रह्मोस क्षेपणास्त्र, ४ पाणतीर, २ जहाजविरोधी रॉकेट्स