जी-२०च्या बैठकीत जाऊन पार्ट्या झोडत आहात. त्यापेक्षा सरकारने जालन्यात जावे. मनोज जरांगे पाटलांवर उपोषण करण्याची ही परिस्थिती का आली? त्यासाठी ईडी-सीबीआय उपयोगी पडणार नाही. आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काय अर्थ आहे, असा प्रश्नही राऊत यांनी केला. मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी ठाणे बंदची हाक दिली आहे. त्याबाबत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. साताऱ्यात दंगलसदृश परिस्थिती का निर्माण झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे सरकारचे अपयश असल्याचेही ते म्हणाले.
मराठा आरक्षण मिळणे शक्य
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडकडून गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा सुरू आहे. मराठा आरक्षण मिळणे शक्य असून, सरकार तडजोड करण्याच्या नादात मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसत आहे, अशी टीका जिल्हाप्रमुख स्वप्निल इंगळे व महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली.
संभाजी ब्रिगेड नाशिकतर्फे कार्यकर्ता सन्मान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी जालन्यातील मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यात आला. मराठा आमदार मराठा आरक्षण मिळवून देण्यात निष्क्रिय ठरल्याचेही त्यांनी सांगितले. सचिव नितीन रोठे-पाटील, विशाल अहिरराव, विक्रम गायधनी, शरद लभडे, सागर पाटील, मंदार धिवरे, चेतन पगार, विकी ढोले, अमोल जाधव, गणेश सहाणे, किरण निकम, रोहिदास गायकर यावेळी उपस्थित होते. जरांगे-पाटील यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने वेळकाढूपणा करू नये. त्यांच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास सरकारला सर्वसामान्य मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मराठ्यांना आरक्षण जाहीर न झाल्यास संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यभर आंदोलन केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
‘झारीतील शुक्राचार्यांमुळे आरक्षण नाही’
झारीतील शुक्रचार्यांमुळे मराठा आरक्षण मिळत नाही. जे मिळाले होते ते टिकले नाही ते टिकण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने विशेष दखल घेतली नाही,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. आंतरवाली सराटी मराठा समाजाचे आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा देताना ते बोलत होते.
शेट्टी यांनी ‘मनोज जरांगे पाटील, आरक्षण योद्धा’ ही टोपी घालून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. शेट्टी म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या सरकारच्या भूमिकेबद्दल संशय आहे. आरक्षण देण्यासाठी कुठल्याही पक्षाचा संघटनेचा अजिबात विरोध नाही जो काही निर्णय घ्यायचा असेल तो ताबडतोब घ्यावा कोणाचे हक्काचे घेऊ नये मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे द्यावे.’