जयपूर: धावत्या कारमध्ये एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) सिलिंडरचा स्फोट होऊन तरुण जिवंत जळाल्याची घटना घडली. दुर्घटना इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. कारचं छत उडून १० फूट दूर जाऊन पडलं. जिवंत जळालेल्या तरुणाचा मृतदेह कारच्या सीटला चिकटला. पोलिसांनी स्थानिकांची मदत घेऊन मृतदेह सीटपासून वेगळा केला. पण कारमधून मृतदेह काढताना तो छिन्नविच्छिन्न झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर शहरातील जस्सा सिंह मार्गावरील पेट्रोल पंपच्या मागील गल्लीत ही घटना घडली. दुर्घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या न्यू चावला कॉलनीत राहणारा संकेत बन्सल (३०) सकाळी १० च्या सुमारास घरातून बाहेर पडला. एलपीजी सिलिंडर आणण्यासाठी तो घरातून निघाला होता. सिलिंडर घेऊन तो घरी परतत होता. त्यानं सिलिंडर कारच्या मागे ठेवला होता. याच दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला. कारचं छत लांबवर जाऊन पडलं. संकेतला सुटकेसाठी वेळच मिळाला नाही. कारमध्येच होरपळून त्याचा शेवट झाला. संकेत बन्सल ऑनलाईन व्यवसाय करायचा. दोन वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगा आहे.पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिकचं पथकही दाखल झालं. संकेतचं घर जवळच असल्यानं त्याचे कुटुंबीयही पोहोचले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची घटना जिथे घडली, त्या भागात फारशी वर्दळ नव्हती. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकलं असतं. दुर्घटनेनंतर कारचं स्टेअरिंग आणि त्याच्या आसपासचा भाग पूर्णत: खाक झाला.कारच्या आतील स्पार्किंग किंवा स्मोकिंगमुळे सिलिंडरचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता गॅस एजन्सी संचालक अजय मित्तल यांनी बोलून दाखवली. सिलिंडर कारच्या मागील बाजूस होता. तिथे वायरिंगमध्ये स्पार्क झाला असावा. त्यामुळे सिलिंडरनं पेट घेतला असण्याची शक्यता आहे किंवा कार चालकानं धूम्रपान केलं असण्याचीही शक्यता आहे, असं मित्तल म्हणाले. जास्त उष्णता सहन करण्याची क्षमता गॅस सिलिंडरमध्ये असते. त्यामुळे उष्णतेमुळे सिलिंडरचा स्फोट झाल्याची शक्यता वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here