अंधानेर फाटा येथे रास्ता रोको
अंधानेर फाटा (ता. कन्नड) येथे सोमवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग धुळे- सोलापूर याठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी हजारोच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. पोलिस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपळा कालीमठ, अंधानेर, कोळवाडी, जामडी, कळंकी, मुंडवाडी, आंबा आदींसह अनेक गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
परभणीत गोंधळ आणि रॅली
मराठा समाजास आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलने सुरूच आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणासाठी शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ तसेच जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव मक्ता येथे सोमवारी, ११ सप्टेंबर रोजी ४४ जणांनी सामूहिक मुंडन करून गोंधळ घालून अनोखे आंदोलन केले. रविवारी गुगळी धामणगाव (ता. सेलू ) येथे ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केले. हादगाव (ता.पाथरी) राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, तर बाबुलतार, खेर्डा या ठिकाणी उपोषण करण्यात आले.
सिल्लोडमध्ये पिठलंभाकरी आंदोलन
सकल मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत पिठलं भाकरी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान तहसील कार्यालयासमोर पिठलं शिजवून पिठलं आणि भाकरीचे सेवन करण्यात आले. या वेळी सरकारला देण्यात आलेल्या निवेदनात, ‘सरकारने लवकर लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा; अन्यथा अशाच प्रकारे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल’ असे नमूद करण्यात आले.
संपूर्ण समाज पाठीशी
‘मराठा आरक्षणाच्या लढाईत संपूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे. जीवावर उदार होऊन आपण सुरू केलेल्या लढ्यास यश मिळेल. समाजाला आपली गरज असून तब्येतीची काळजीसुद्धा घ्या,’ असा सल्ला जालना येथील ज्येष्ठ नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.
जरांगे पाटील यांची सोमवारी जेष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष ज्ञानदेव पायगव्हाणे, आर. आर. खडके, मोतीराम अग्रवाल जालना मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अंकुशराव राऊत, प्रा. जयराम खेडेकर, धर्मराज खिल्लारे, योगेश देशमुख यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी भेट घेऊन तब्येतीची विचारणा केली.
ठाण्यात बंद संमिश्र
सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवारी ठाणे शहरात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठ आणि दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. मात्र ठाणे परिवहन सेवा सुरळीत सुरू होती. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा नियोजित ठाण्याचा दौरा होता. पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात येणार होते. याठिकाणी बैठक घेण्यात येणार असल्याने तशी तयारी प्रशासनाने केली होती. मात्र, मराठा समाजाने पुकारलेल्या बंदमुळे पालकमंत्री देसाई ठाण्यात आले नाहीत, असा आरोप मराठा मोर्चाचे समन्वयक प्रवीण जाधव यांनी केला. सायंकाळी बंद मागे घेतल्यानंतर मराठा समाजाच्या विविध प्रतिनिधी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त केला.
चंद्रपुरात जरांगे पाटील यांना विरोध
मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी समाज एकवटला आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन पाठवून परिस्थिती चिघळल्यास राज्य सरकार जबाबदार राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुळात ओबीसी समाजात तब्बल ४२३वर जाती आहेत. यात मराठा समाजाचा अंतर्भाव करण्यात आल्यास ओबीसींना आरक्षण हक्काचा लाभ मिळणे कठीण होईल, असा मुद्दाही मांडला जात आहे. या अनुषंगाने एकूण १२ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. या मागण्यांची धग सरकारपर्यंत पोहचावी म्हणून टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.