संभाजी भिडे यांनी सर्व सूत्रं हाती घेतल्यानंतर अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे यांनी काहीतरी कारण देऊन व्यासपीठावरुन काढता पाय घेतला. त्यानंतरही भिडे प्रसारमध्यमांशी बोलत राहिले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची जबाबदारी आता मनोजदादा जरांगे-पाटील यांनी आपल्याकडे द्यावी, अशी विनंती यावेळी संभाजी भिडे यांनी केली. वीर मराठा मनोज जरांगे यांनी चालवलेलं उपोषण कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रयत्नांना आज ना उद्या १०१ टक्के यश मिळेल. मराठा आरक्षणाचा निर्णय हा राजकीय पातळीवरचा आहे. महाराष्ट्रातील शासनकर्ते असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मी या तिघांबद्दल एक शब्द देतो की, ही तिन्ही मंडळी धुरंधर आहेत. मनोज जरांगे यांना पाहिजे ते घडवल्याशिवाय हे तिघे राहणार नाहीत. मनोज जरांगे यानी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश येण्यासाठी माझ्यावर जबाबदारी द्यावी. मी या राजकारणी लोकांकडून पाहिजे तसं करुन घेईन. मी राजकारणी नाही. त्यामुळे शब्द फिरवून बोलणं मला जमत नाही. माझ्यापाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या लक्षावधी तरुणांचा पाठिंबा आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी सुरु केलेला लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही जिवाच्या आकांताने प्रयत्न करु. या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.
गुरुजींना आपल्याला पाठिंबा दिला ही आनंदाची गोष्ट: मनोज जरांगे
यावेळी मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रथमच गुरुजी आले असतील. ही आपल्यासाठी आनंदासाठी आणि भाग्याची गोष्ट आहे. आम्ही गोरगरिबांची लेकरं, आमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप द्यायला गुरुजी आले. मी उपोषणाने घायाळ झालो होतो. पण गुरुजींच्या येण्याने मला आणखी बळ मिळालं, अशी भावना यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली.