संभाजी भिडे काय म्हणाले?
“मी आज आलोय ज्ञानोबा-तुकोबा, संत एकनाथ, सावता माळी, गोरा कुंभार, पांडुरंग, विठ्ठल रखुमाई यांचा निरोप घेऊन, राजकारणी माणसांनी रागवू नका, तुम्ही राजकारणी नाही.. आम्ही जे काम करतोय, आम्ही म्हणजे समाज.. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान.. लक्षावधी तरुण पोरं… निस्वार्थ अंतकरणाने देश, देव, धर्मासाठी काम करणारे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, ही समस्या संपेपर्यंत. आज केवळ देखाव्यासाठी आलो नाही.” असं आश्वासन संभाजी भिडे यांनी दिलं.
“तुम्ही मागे वळून पाहायचंच नाही, जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या निश्चयाने आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही करताय ते अगदी १०१ टक्के योग्य करताय. जोपर्यंत राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे, शेवाळावरुन चालण्यासारखं आहे. एक चांगलं म्हणजे आता जे राजकारणी सत्तेवर बसलेत, एकनाथ शिंदे अजिबात लबाड नाहीत, देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत, अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळीज असलेला माणूस आहे.” अशा शब्दात भिडेंनी कौतुक केलं.
“आपण हे आंदोलन जीवाच्या आंकाताने चालवलंय, कौतुक कौतुक वाटावं इतकं चांगलं चालवलंय, व्यवहार म्हणून उपदेश करायला आलो नाही, मी वारकरी, हे राजकारणी, पण ही धर्माची समस्या आहे, तुमच्या तपस्येला शंभर टक्के फळ येणार, राजकारणी आहेत म्हणून मनात बिचकू नका, जो शब्द ते देतील, ते पाळून घ्यायचं काम माझ्याकडे द्या. मी असा कोणा लागून गेलो जगन्नियंता, मी जर तुम्हाला म्हणत असेन, ही लढाई आहे, झट की पट, एक घाव दोन तुकडे अशी नाही, तुमच्या सत्याग्रहाच्या बाजूने लढाई यशस्वी होणार आहे” असंही भिडे म्हणाले.
“आपण मोठ्या मुत्सद्दीपणाने हे उपोषण थांबवूया, मी तुम्हाला नाउमेद करायला आलो नाही, उपोषणाचा उद्देश आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळवणं, तो यशस्वी होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत, मनात शंकासुद्धा घेऊ नका की ही मंडळी पुढे काय करतील, कळकळीची विनंती आहे, की उपोषण थांबवू, लढा नाही. जगात सगळे खोटं बोलतात, पण आई मुलाशी खोटं बोलत नाही, हा जिजा माऊलीचा निरोप आहे. मी चलाखी लबाडी करणार नाही” असा शब्द भिडेंनी जरांगेंना दिला.