यासंदर्भात बोलताना जरांगे-पाटील यांनी म्हटले की, मध्यरात्री एक महिला दोन महिन्यांचं लेकरु घेऊन आली. इथे बसलेले सगळे रडायला लागले. रात्री सगळ्या माता-भगिनी आल्या. लहान लेकरं, गाव उपाशी होतं, सगळेजण आक्रोश करायला लागले. तुम्ही पण हवेत आणि आरक्षण पण पाहिजे, असे त्यांनी म्हटलं. मी पहिल्यांदाच गावाचं ऐकून पाणी आणि सलाईन सुरु केली. पण माझं आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरु राहणार. महाराष्ट्राने शंका घेण्याचे काम नाही. मी फक्त मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांपुरता नव्हे तर महाराष्ट्रातली प्रत्येक मराठा बांधवाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवेन, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
शिंदे लबाड नाहीत, फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत, उपोषण थांबवा: संभाजी भिडे
संभाजी भिडे यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी येथे येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना राज्य सरकारकडून मराठा आरक्षण मिळवण्याची जबाबदारी माझी, तुम्ही उपोषण थांबवा, अशी विनंती केली. एक चांगलं म्हणजे आता जे राजकारणी सत्तेवर बसलेत, एकनाथ शिंदे अजिबात लबाड नाहीत, देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत, अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळीज असलेला माणूस आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.