लखनऊ: उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात एका घरातून मानवी सांगाडा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. घर तोडताना कामगारांना मानवी सापळा दिसला. ही बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पाडकाम सुरू असलेल्या घराजवळ तोबा गर्दी जमली. मानवी सांगाडा नेमका कोणाचा आहे, त्याचा शोध अद्याप लागलेला नाही.मानवी सापळा सापडल्याची माहिती पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सापळा ताब्यात घेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. सांगाडा सापडल्याची गोष्ट परिसरात पसरताच चर्चांना उधाण आलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरात सांगाडा सापडला ते घर आधी डॉ. नरेश अग्रवाल यांच्या मालकीचं होतं. ते ऑर्थोपेडिक सर्जन होते. त्यांनी हे घर अछनेराचे माजी चेअरमन अशोक अग्रवाल यांना विकलं. अग्रवाल जुनं घर पाडून नवं घर बांधणार होते. घर तोडताना मजुरांना एक खोका सापडला.मजुरांनी खोक्याचं कुलूप तोडलं. त्यात मानवी सापाळा सापडला. तो पाहून कामगारांची भीतीनं गाळण उडाली. त्यांनी काम थांबवून तिथून पळ काढला. यानंतर खोक्यात सापडलेल्या सांगाड्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्राथमिक तपास केला. खोक्यात सापडलेला सांगाडा डमी असल्याचं तपासातून समोर आलं आहे.प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी खोक्यात सापडलेला सांगाडा फॉरेन्सिककडे पाठवला. प्रकरणाचा तपास सुरू असून प्रयोगाशाळेचा अहवाल पुढे आल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती अछनेराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली. सध्या पोलीस घर मालकाची चौकशी करत आहेत.
Home Maharashtra जुन्या घराच्या पाडकामावेळी सापडला खोका; उघडताच मजुरांची बोबडी वळली, काम टाकून पळाले...