: भांडणादरम्यान पतीनं पत्नीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे पत्नी खाली पडली. तिची शुद्ध हरपली. काही वेळानं तिला शुद्ध आली. तेव्हा तिला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. श्रीमुखात लगावल्यानं पत्नीची शुद्ध हरपली. तिची हालचाल जाणवत नसल्यानं पती घाबरला. पतीचा मृत्यू झाल्याचं समजून त्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं.रणजीत राजेश देवेंद्र असं मृत तरुणाचं नाव आहे. तो २२ वर्षांचा होता. देवेंद्र कुरिअर कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र आणि त्याची पत्नी अभिरामी (२०) यांचा प्रेम विवाह होता. त्यांनी कोर्टात लग्न केलं होतं. दोघे वडाळ्यातील आंबेडकर नगरात राहायला होते. तर देवेंद्रचे आई, वडील त्यांच्या जवळच्या परिसरात वास्तव्यास आहेत.देवेंद्र आणि अभिरामी यांच्यात वाद सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं त्यांच्यात भांडणं सुरू होती. त्यामुळे देवेंद्र तणावाखाली होता. रविवारी संध्याकाळी दोघांमध्ये वाद झाला. भांडण विकोपाला गेलं. देवेंद्रनं पत्नीच्या कानशिलात लगावली. ती खाली पडली आणि बराच वेळ उठलीच नाही. काही वेळानं अभिरामी शुद्धीवर आली. तेव्हा तिला देवेंद्र पंख्याला लटकलेल्या स्थितीत दिसला. याची माहिती तिनं जवळच राहणाऱ्या सासू सासऱ्यांना दिली. यानंतर देवेंद्रला सायन रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.या प्रकरणी पोलिसांनी अभिरामीचा जबाब नोंदवला. ‘वाद सुरू असताना देवेंद्रनं कानशिलात लगावली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला, अशी माहिती पत्नीनं जबाबात दिली,’ असं पोलिसांनी सांगितलं. परिस्थितीजन्य पुरावे पाहता यात कोणताच घातपात दिसत नाही. त्यामुळे अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याचं वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर अर्गडे यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here