याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आठ दिवसापूर्वी जेल रोड येथील पंचक येथे राहणारा ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय ३०) हा विवाहित युवक मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता. पण तो पुन्हा घरी परतलाच नाही. ज्ञानेश्वरच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार नाशिक रोड पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस युवकाचा तपास करत असतानाच काल गोदाकाठी आगार टाकळी परिसरात मलनिस्सारण केंद्राजवळ छिन्न-विच्छिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा पंचनामा केला असता छातीवर खोल जखमा आढळून आल्या. तसेच त्याच्या चेहऱ्यावर सिमेंट सदृश्य पावडर देखील टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.
ज्ञानेश्वर याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे समजते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी खून झालेल्या युवकाच्या पत्नीला व तिच्या प्रियकराला संशयावरून ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच इतर दोन-तीन व्यक्तींना सुद्धा चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत. ज्ञानेश्वर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मित्रांसोबत पार्टीला जायचं म्हणून ज्ञानेश्वरने घरातून जेवण तयार करून सोबत घेतले होते. दुपारच्या सुमारास दुचाकीने तो घरापासून निघाला मात्र पुन्हा घरी परतलाच नाही