मनोज जरांगे काय म्हणाले?
समाजाच्या हितासाठी हा लढा उभारला आहे. गेल्या पाच दशकापासूनचा हा प्रश्न आहे. मी पारदर्शकपणानं निर्णय घेतो. तुम्ही फक्त घोषणा देऊ नका, आरडाओरडा करण्यात मराठ्यांच्या पोरांचं हित नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. आपल्याला एका विचारानं राहायला पाहिजे. मी समाजासाठी पारदर्शकपणे काम करत आहे, असं जरांगे म्हणाले.
भारत स्वतंत्र झाल्यापासून एकदाही सर्वपक्षांची बैठक झाली नव्हती. सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाच्या ठरावावर बैठक घेतली. मराठा समाजानं तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी काम केलं. मराठ्यांचा मुलगा बरबाद होत आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा पोरांच्या बाजूनं उभं राहा, असं मनोज जरांगे म्हणाले.
महाराष्ट्रात आंदोलनाच्या ज्या केसेस झाल्या होत्या त्या मागं घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं सरकारनं सांगितलं. ज्यांनी लाठीमार केले ते सर्व निलंबित होणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
बाकी सगळं झालं आरक्षणाचं काय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. सरकारला दोन दिवस वेळ दिला, पुन्हा चार दिवस वेळ दिला समाज काय म्हणला नाही. सरकारला वेळ दिला काय अन् नाय दिला काय हा आरक्षण घेतल्याशिवाय थांबत नाही, हे समाजाला माहिती आहे.
जेव्हा आरक्षणाचं पत्र सामान्य माणसाच्या हातात पडेल तेव्हाच थांबू, असं मनोज जरांगे म्हणाले. समाजानं ४० वर्षांचा वेळ दिला. सरकारनं एक महिना वेळ कशासाठी हवाय हे सांगावं, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.