मुंबई : मराठा समाजासाठी प्राण पणाला लावलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकार गेली आठवडाभर प्रयत्न करतंय. पण आरक्षण हाच माझ्या उपोषणावरील उतारा आहे, असं सांगून आता माघार नाहीच, असा जरांगे पाटील ठणकावून सांगत आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस असल्याने त्यांची प्रकृती ढासळली आहे. जलत्याग आणि उपचार घेणंही त्यांनी बंद केलं होतं. मात्र गावकऱ्यांच्या कळकळीच्या विनंतीनंतर जरांगे पाटलांनी सलाईन घेण्यास होकार दिला. जरांगे पाटलांची दिवसेंदिवस ढासळत चाललेली प्रकती पाहून त्यांनी लढाई सुरू ठेवावी पण उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती आता राजकीय नेते करू लागले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटलांना साद घातली आहे.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मागील चौदा दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणत्र देण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरात पाठिंबा वाढत आहे. सिल्लोड, पळशी यांसह अनेक शहरांतून मराठा समाज विविध प्रकारे आंदोलने करून पाठिंबा दर्शवत आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनीही उपोषणाची धार तीव्र केली आहे. सरकारकडून आश्वासनाची खैरात होत असताना जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी जरांगे पाटलांना भावनिक आवाहन करणारं ट्विट केलं आहे.

जितेंद्र आव्हाड-धनुभाऊंची दोस्ती दुश्मनीत कशी बदलली? त्याचीच ही गोष्ट…!
रोहित पवार यांची जरांगे पाटलांना भावनिक साद

रोहित पवार म्हणाले, “मनोज जरांगे पाटील अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवत आहे. तसेच त्यांची एक किडनी सुद्धा काम करत नाही. परिणामी उपोषण सुरु ठेवणे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे”.

“आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या खऱ्या आणि निस्वार्थी हिऱ्याचे आरोग्य धोक्यात आले तर समाजाचे खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे तूर्तास तरी समाजाचा व कुटुंबाचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यायला हवे. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, कौटुंबिक-मित्र परिवारासह सर्वांनीच उपोषण सोडण्यासाठी त्यांना साद घालावी ही कळकळीची विनंती”.

राष्ट्रवादीची ‘ए’ टीम कोणती आणि ‘बी’ टीम कोणती? हेच कळायला मार्ग नाही : विश्वजीत कदम
जरांगे पाटलांची ‘आरपार’ची भूमिका

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा १५ वा दिवस आहे. सरकारने यासंबंधीचा अध्यादेश तर काढलाय पण त्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर काहीच विचार न झाल्याने किंवा तशी सुधारणा न केल्याने त्यांनी आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, त्यांनी सरकारला दिलेला ४ दिवसांचा अल्टिमेटम संपल्याने आता त्यांनी ‘आरपार’ची भूमिका घेतली आहे.

‘मराठा समाजाने ७५ वर्षे अन्याय सहन केला आहे, आता माघार नाही, आरक्षण मिळत नाही हेच दुखणे आणि आरक्षण हाच आपल्या प्रकृतीवर उपाय आहे,’ असे मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी रात्री सांगितले. दरम्यान, सोमवारी दिवसभरात सरकारकडून कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

जरांगेंचं उपोषण स्तुत्य आणि योग्य, शिवप्रतिष्ठान त्यांच्या पाठिशी; संभाजी भिंडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here