म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘मला खूप त्रास होत आहे आणि मी या यातना सहनही करू शकत नाही. माझे शरीरही जास्त काळ साथ देण्यासारखे नाही. माझ्याकडे जी काही माहिती होती ती मी सर्व सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेली आहे’, असे जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (७४) यांनी सोमवारी ईडीने कोठडी वाढीची मागणी केल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयास सांगितले. तर अधिक चौकशीसाठी आणखी चार दिवसांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचे म्हणणे ईडीने मांडले. न्यायालयाने ईडीची विनंती मान्य करत गोयल यांच्या ईडी कोठडीत १४ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.

ट्रॅव्हल एजन्सी ते जेट एअरलाइनपर्यंत प्रवास, नरेश गोयल यांच्या साम्राज्याला कशी लागली उतरती कळा?

कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी ६२ लाख रुपयांच्या कर्जघोटाळा प्रकरणात ईडीने गोयल यांना प्रदीर्घ चौकशीनंतर १ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांची ईडी कोठडीची मुदत संपत असल्याने अधिकाऱ्यांनी सोमवारी न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर हजर केले. तेव्हा ‘आरोपीने (गोयल) अपहार केलेल्या रकमेपैकी बहुतांश रक्कम ही विदेशांतील खात्यांमध्ये दडवून ठेवण्यात आली आहे आणि त्याची देखभाल करण्याकरिता संयुक्त अरब अमिरात या देशात एक व्यक्ती नेमण्यात आला आहे, असे तपासातून समोर आले आहे. आरोपीने अनेक विदेशी कंपन्यांतही गुंतवणूक केली असली तरी त्यांची नावे उघड करण्याबाबत असहकार्य केले जात आहे’, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तर ‘गोयल यांनी त्यांच्याकडील सर्व माहिती, बँक खात्यांचा तपशील, कागदपत्रे यापूर्वीच ईडीकडे दिली आहेत. यापूर्वी नऊवेळा ते चौकशीला हजर राहिले आहेत. त्यामुळे चौकशीत असहकार्य केले जात असल्याचा ईडीचा दावा चुकीचा आहे. त्यांनी जी काही कर्जे घेतली ती कंपनीसाठी घेतली. वैयक्तिक किंवा कुटुंबीयांच्या कामांसाठी घेतली नाहीत. कंपनीच्या ताळेबंदात सर्व काही आहे. कंपनीच्या दैनंदिन कामकाजाबाबतच्या प्रश्नांवर उत्तरे देण्यातील त्यांच्या असमर्थतेला चौकशीतील असहकार्य म्हणता येणार नाही’, असे म्हणणे गोयल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मांडले.

ट्रॅव्हल एजंट म्हणून काम मग एअरलाइन क्षेत्रात ‘टेक ऑफ’; एक चुकीच्या निर्णयाने कंपनी डबघाईला

न्यायालयाने गोयल यांना याबाबत विचारणा केल्यानंतर ते भावूक झाले. ‘मला खूप त्रास होत आहे आणि मी या यातना सहनही करू शकत नाही’, असे आर्जव त्यांनी केली. अखेरीस दोन्ही बाजू तपासल्यानंतर न्यायाधीशांनी गोयल यांची ईडी कोठडी १४ सप्टेंबरपर्यंत वाढवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here