कोलंबो: आशिया कपच्या सुपर-४मध्ये आज मंगळवारी भारताची लढत श्रीलंकेविरुद्ध होत आहे. कालच भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. आज श्रीलंकेविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. या दोघांनी पहिल्या षटकापासून धावांचा वेग चांगला ठेवला. सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितने कसून रजिथाला षटकार मारला. या षटकारासह रोहितने एक मोठा विक्रम देखील केला. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत २३ धावा करताच रोहितच्या वनडे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण झाल्या. रोहितने फक्त दहा हजार धावांचा टप्पा पार केला नाही तर त्याने सर्वात वेगाने १० हजार धावा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होण्याचा मान मिळवला. याबाबत रोहितने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड; सचिनला मागे टाकले, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
रोहितने २४१ डावात हा टप्पा पार केला. सचिनला यासाठी २५९ डाव लागले होते. याबाबत भारताचा विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने फक्त २०५ डावात १० हजार धावा केल्या होत्या. कालच विराटने वनडेमधील सर्वात वेगाने १३ हजार धावांचा टप्पा पार केला होता. विराटने काल सचिनचा सर्वात वेगाने १३ हजार धावांचा विक्रम मागे टाकला होता. तर आज रोहितने सचिनला मागे टाकले. या बाबत सौरव गांगुली २६३ डावांसह चौथ्या तर २६६ डावांसह रिकी पॉन्टिंग पाचव्या स्थानावर आहे.

वनडेत १० हजार धावा करणारे भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर- १८ हजार ४२६ धावा
विराट कोहली- १३ हजार २४ धावा
सौरव गांगुली- ११ हजार ३६३ धावा
राहुल द्रविड- १० हजार ८८ धावा
महेंद्र सिंग धोनी- १० हजार ७७३ धावा
रोहित शर्मा- १० हजार

– जगातील १६ फलंदाजांनी आतापर्यंत वनडेत १० हजार धावा केल्या आहेत. त्यात सर्वोत्तम सरासरी विराट कोहलीची (५७.६२) आहे. धोनीची सरासरी ५०.५७ इतकी असून रोहितची ४९.०२ इतकी आहे.

– श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माने ४८ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह ५३ धावा केल्या. या डावातील २ षटकारांसह आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने स्वत:च्या नावावर केला. रोहितच्या नावावर आशिया कपमध्ये २८ षटकार झाले आहेत. हा विक्रम आधी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रीदीच्या नावावर होता.

– सलामीवीर शुभमन गिल बाद झाल्यानंतर त्यानंतर आलेल्या विराट कोहलीसोबत रोहितने फक्त १० धावांची भागिदारी केली. पण यात १० धावात दोघांनी एक विक्रम केला. वनडेत रोहित-विराट यांनी ५ हजार धावांची भागिदारी पूर्ण केली. यात १५ अर्धशतकी तर १८ शतकी भागिदारी आहेत. वनडे क्रिकेटच्या इतिहासात किमान ४ हजार धावांची भागिदारी करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित आणि विराट यांची सरासरी सर्वोत्तम आहे. या दोघांनी ८६ डावात ६२.५७च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here