याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतून शस्त्राचा धाक दाखवून खंडणीसाठी एका १४ वर्षीय बालकाचे अपहरण निळ्या रंगाच्या मारुती झेन या गाडीतून करण्यात आले. याबाबत हिंजवडी पोलिसांनी आरोपीने ज्या मोबाईलवरून फोन केला होता त्याचे लोकेशन तपासले असता, ते सासवड परिसरात असल्याने त्यांनी याची माहिती सासवड पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पथके तयार करून सासवड शहरात येणाऱ्या रोडवर शोध मोहिम सुरु केली.
दरम्यान, शोध घेत असताना जुना कोडीत नाका ते सोपानकाका मंदिर रोडवर पोलिसांना सिध्दिविनायक अॅटो गॅरेज समोर एक गडद निळ्या रंगाची मारुती झेन कार संशयितरित्या समोरुन येताना दिसली. त्यावेळी पोलिसांनी गाडी अडवून गाडीतील व्यक्तींना खाली उतरवून गाडीची झाडाझडती घेतली. त्यात लहान मुलगा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे १ अग्निशस्त्र, १ लांब पात्याचा कोयता, १ सत्तूर, १ कटावणी, एक लोखंडी हातोडी, ३ मोबाईल मिळून आले. अपहृत बालक, ३ आरोपी जप्त हत्यारांसह त्यांना सासवड पोलिसांत आणण्यात आले. त्यातील एका आरोपींची आई आजारी असल्याने दवाखान्यात पैशांची गरज होती म्हणून घरासमोरून त्याचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी त्या मुलाच्या वडिलांना फोन केला मुलगा जिवंत हवा असेल तर तीस लाख रुपये घेऊन आम्ही सांगेल त्या ठिकाणी ये, असे म्हणत खंडणी मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत कारवाई केली.