सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेली प्रणाली तीव्र न झाल्याने राज्यात फारसा पाऊस पडला नाही. या काळात जळगाव, मराठवाड्यातील काही भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस पडला. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक पावसाची गरज आहे. सध्या सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. या आठवड्यात निर्माण झालेल्या प्रणालीचा फायदा महाराष्ट्राच्या अंतर्भागात होऊ शकतो, असेही नायर यांनी स्पष्ट केले.
ही प्रणाली वायव्येकडे सरकल्यावर त्याचा कोकणातही प्रभाव दिसू शकेल. मंगळवारी वर्तवलेल्या पुढच्या पाच दिवसांच्या पूर्वानुमानानुसार शनिवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात मात्र शनिवारपर्यंत मध्यम स्वरूपाच्याच सरींची शक्यता आहे.
२४ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता
या आठवड्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानंतरही पुढच्या आठवड्यात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते, मात्र त्याबद्दल या आठवड्याच्या अखेरीस अधिक स्पष्टता येईल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या क्षेत्राचाही वायव्य दिशेने प्रवास झाल्यास त्याचाही राज्याला फायदा होऊ शकेल. या क्षेत्रामुळे २४ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित पावसाचे प्रमाण कमी होईल. मात्र पुढील १० दिवस राज्यात पाऊस पडल्यास ऑगस्टमध्ये निर्माण झालेली तूट काही प्रमाणात भरून निघायला मदत होऊ शकते.