म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मध्य रेल्वेच्या प्रवाशांना धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दादर स्थानकातील फलाट क्रमांक १चे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी या फलाटाला जोडून असलेला फलाट क्रमांक २ शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून बंद केला जाणार आहे. याचाच अर्थ दादरहून सुटणारी धीमी लोकलसेवा इतिहासजमा होणार आहे. त्यामुळे धीमी ‘दादर लोकल’ पकडणाऱ्या प्रवाशांना आता परळ स्थानक गाठावे लागणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांना जोडणाऱ्या दादर स्थानकाला प्रवाशांची प्रथम पसंती असते. मुंबई तसेच परिसरातील खरेदीदारांसाठीही दादर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. किरकोळ खरेदीदारांपासून ते घाऊक खरेदीदारांपर्यंत सर्व जण दादरचीच निवड करतात. मात्र, सीएसएमटीहून प्रवाशांनी भरून येणाऱ्या लोकलमध्ये अवजड बॅगांसह प्रवेश करणे हे मोठे दिव्य असते. अशावेळी मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक २वरून सुटणाऱ्या ‘दादर लोकल’मुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो.

चांगली बातमी! १६ ते १९ सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर वाढणार, पाहा तुमच्या शहरात पाऊस कधी
मुंबईच्या लोकल प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच गेली आहे, मात्र त्या प्रमाणात स्थानकांतील प्रवासी सुविधा अद्ययावत झालेल्या नाहीत. यामुळे दादरच्या फलाट क्रमांक १ आणि २वर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. अरुंद फलाटावर प्रवाशांची रेटारेटी आवरताना रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होते. यामुळे फलाटावरील गर्दी नियोजनासाठी फलाटाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

मध्य रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक १ची लांबी २७० मीटर असून रुंदी ७ मीटर आहे. आता फलाटाची रुंदी साडेतीन मीटरने वाढवून १०.५ मीटर केली जाणार आहे. रुंदीकरणाचे काम शुक्रवारपासून सुरू होणार असून यासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर…
रुंदीकरणानंतर फलाट क्रमांक १वर सरकते जिने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अरुंद फलाटामुळे रखडलेल्या पायऱ्यांची रुंदीदेखील वाढवण्यात येणार आहे. यामुळे फलाटावरील गर्दी विभागणार असून दादर स्थानकातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

फलाट १-२वर दोन पादचारी पूल आहेत. रुंदीकरणाच्या कामासाठी फलाट क्रमांक २वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या एकूण २२ लोकल फेऱ्या परळ टर्मिनसहून सुटणार आहेत. पुढील सूचनेपर्यंत ‘दादर लोकल’ परळ स्थानकातूनच चालवण्यात येणार आहे.

खरेदीदारांचे हाल

गणेशोत्सवापूर्वी शेवटचा शनिवार-रविवार १६-१७ तारखेला आहे. यामुळे खरेदीदारांची दादरच्या बाजारपेठांमध्ये मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने दादरचा फलाट क्रमांक २ शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका खरेदीदारांना बसणार आहे. अवजड बॅगा सांभाळत या प्रवाशांना परळ स्थानक गाठावे लागणार आहे.

दादर स्थानकातील अप-डाउन धीम्या लोकल फेऱ्या कायमस्वरूपी परळ स्थानकातून चालविण्यात येणार आहेत. यामुळे दादर लोकल बंद होऊन आता परळ लोकल सुरू होणार आहेत. दादर जलद लोकल मात्र वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध राहणार आहेत. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

फलाट १ – सीएसएमटी-परळहून सुटणाऱ्या धीम्या लोकल

फलाट २ – दादरहून सुटणाऱ्या लोकल

काय होणार? – फलाट रुंदीकरण (१०.५ मीटरचा फलाट)

खर्च – अंदाजे १ कोटी रुपये

कालमर्यादा – किमान दोन महिने

प्रवाशांना मिळणार – रुंद फलाट, सरकते जिने, रुंद जिने, गर्दीची विभागणी

प्रवासी गमावणार – दादर लोकल (दादर लोकल परळहून सुटणार)

अंमलबजावणी – शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून

प्रवाशांचा रेटा एवढा की दार बंद न होताच एसी लोकल मार्गस्थ, ठाणे रेल्वे स्थानकातला व्हिडिओ व्हायरल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here