राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय समन्वयक बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात होणार आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारात होणाऱ्या या बैठकीला सरसंघचालक, सरकार्यवाह यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संघ परिवारातील सुमारे ३६ संघटनांचे २६० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.
अयोध्येत राम मंदिर उभे राहावे, यासाठी संघ परिवाराने दीर्घकाळ लढा दिला. त्यानंतर आता राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. अयोध्येत उभे राहणारे राम मंदिर हे भारताच्या पुननिर्माणाचे प्रतीक आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त देशभर हिंदू समाज जागरण-राम मंदिर लोकार्पण अभियान राबवले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गावोगावी घरोघरी, राम मंदिरांवर रोषणाई केली जाईल. जागोजागी मोठ्या पडद्यावर अयोध्येतील कार्यक्रम थेट प्रसारित केले जातील. गावोगाव यज्ञ, पूजा, महाआरती केली जाईल. गावोगावी शोभायात्रा काढण्यात येतील. मिठाईवाटप, भोजनावळी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाईल. या विषयीची सविस्तर रूपरेषा विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींकडून समन्वय बैठकीत मांडली जाईल. परिषदेच्या नेतृत्वातच हे अभियान राबवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
देशभरातून विविध धर्मपंथांचे हजारो संत महंत, धर्मगुरू, अध्यात्मिक गुरूंना अयोध्येत निमंत्रित केले जाईल. जगभरातील १५० हून अधिक देशांच्या प्रतिनिधीही या सोहळ्यात सहभागी होतील. देशाच्या विविध भागातून कारसेवक तसेच रामभक्त खास रेल्वे व बसच्या माध्यमातून अयोध्येत दाखल होतील. सध्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होईल, अशी चर्चा असली, तरी ही तारीख बदलू शकते. डिसेंबरअखेर व जानेवारी महिन्यातील काही तारखा पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात आल्या आहेत. तिथून तारीख अंतिम झाल्यानंतर मंदिर ट्रस्टतर्फे पंतप्रधानांना अधिकृत निमंत्रण दिले जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मोतीबागेत बैठकीवर चर्चा
समन्वय बैठकीची रूपरेषा अंतिम करण्याबरोबरच अन्य विषयांवर मोतीबाग या संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक व सरकार्यवाह; तसेच संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक सोमवारपासून सुरू झाली आहे. मंगळवारी दिवसभर ही बैठक सुरू होती. समन्वय बैठकीच्या व्यवस्थेचा आढावाही या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.