म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर अशा पाच दिवस बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची नेमकी कार्यक्रम पत्रिका काय हे अजूनही गुलदस्तात असले, तरी या अधिवेशनापासून संसदीय कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार आहे. नवीन गणवेशात बंद गळ्याच्या सूटची जागा कमळाचे चित्र असलेला शर्ट व मणिपुरी टोपी घेणार आहे. ‘कमळ’ हे सत्तारूढ भाजपचे निवडणूक चिन्ह असल्याने यावरून वाद उभा राहिला आहे. मार्शलचाही गणवेशबदलनव्या संसदेतील विशेष अधिवेशनात कर्मचारी नवीन गणवेशात दिसणार आहेत. संसदीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा नवीन पोषाख भारतीयत्वाचे प्रतीक असेल, असा सरकारचा दावा आहे. जांभळ्या, तपकिरी व गडद गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट व कमळाच्या फुलाचे चिन्ह असा शर्ट असेल, तर खाकी रंगाची पँट असेल. संसदेच्या दोन्ही पीठासीन अधिकाऱ्यांच्या बाजूला असलेले ‘मार्शल’ही आता सफारी सूटऐवजी क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा व मणिपुरी पगडी अशा गणवेशात दिसतील. महिला कर्मचारी नवीन नक्षीच्या साड्यांमध्ये दिसतील. सचिवालयात काम करणारे अधिकारी-कर्मचारीही बंद गळ्याच्या सूटऐवजी गुलाबी किंवा किरमिजी रंगाचे नेहरू जॅकेट घालतील. – रचना कोणाची?नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने (एनआयएफटी) संसदीय कर्मचाऱ्यांच्या या नवीन गणवेशाची रचना केली आहे. ‘या नव्या गणवेशावर कमळच का, मोर का नाही,’ असा सवाल खासदार मणिक्कम टागोर यांनी विचारला आहे. ‘संसदीय कामकाजात घुसून तुम्ही राजकारण करणार असाल, तर त्याला तेवढेच चोख व ठोस प्रत्युत्तर मिळेल,’ असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी दिला आहे.– गणपती पूजनानंतर स्थलांतरसध्याच्या माहितीनुसार, विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, १८ सप्टेंबर रोजी सध्याच्या संसद भवनात बैठक होणार आहे. दुसऱ्या दिवशी, १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला पूजा केल्यानंतर नव्या संसदेत विधिवत प्रवेश होईल. यासाठीची पूर्वतयारी अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. या अधिवेशनात जुन्या संसद भवनाच्या बांधकामापासून संसद भवनातील विशेष आठवणींवरही चर्चा करण्याचे सरकारच्या मनात आहे. नव्या संसदेत (लोकसभा) एक संयुक्त बैठकही होऊ शकते. या विशेष अधिवेशनात शून्य प्रहर, प्रश्नोत्तराचा तास किंवा खासगी सदस्यांच्या विधेयकांचे कामकाज होणार नाही. या पाच बैठकांसाठी धक्कादायक ठरतील, अशी किमान तीन-चार विधेयके सरकारने तयार ठेवल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here