जयपूर: बायको मला सोडून गेली, प्रेयसीनं विश्वासघात केला. सासरच्यांनी माझ्याकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत आणि मित्रांनी दगा दिला… अशा शब्दांत आपली व्यथा मांडत व्यापाऱ्यानं आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी त्यानं ६ मिनिटांचा एक व्हिडीओ केला. त्यात त्यानं त्याची व्यथा मांडली. यासोबतच पाच पानांची सुसाईड नोटही मागे ठेवली. घटना राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील कोटपुतली-बहरोडमधील आहे.व्यापारी सुनील कुमार शर्मा यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ केला. ‘जग खूप खराब झालंय. कोणीच कोणाचं नाही. सगळं व्यर्थ आहे,’ असं शर्मांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. आपल्याकडून कोणी कोणी पैसे उधार घेतले होते त्यांची यादीच शर्मांनी वाचून दाखवली. बानसूरमध्ये राहणाऱ्या सुनील कुमार शर्मांनी ३१ ऑगस्टला आत्महत्या केली. जीव देण्यापूर्वी त्यांनी पत्नी आणि प्रेयसीवर आरोप केले. ‘वर्षभरापूर्वी पत्नी सोडून गेली. तिनं आजतागायत फोन केला नाही. प्रेयसीनंही विश्वासघात केला. सासरच्यांनी एक लाख रुपये घेतले होते. ते त्यांनी आतापर्यंत परत केले नाहीत,’ असं शर्मा आत्महत्येपूर्वी म्हणाले.तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट लागली. सुनील शर्मांच्या खिशात पाच पानांची नोट सापडली. त्यात सुनील यांनी आत्महत्येच्या कारणांसोबतच बरीच महत्त्वाची माहिती लिहिली आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. सुनील यांच्या आत्महत्येनंतर ११ दिवसांनी अचानक त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ ६ मिनिटं ५० सेकंदांचा आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण हादरले. आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख सुनीलनं व्हिडीओत केला आहे.बहरोडमध्ये सुनीलचं मोबाईलचं दुकान होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यानं भागिदारीत एक हॉटेल सुरू केलं होतं, अशी माहिती सुनीलचे वडील प्रमोद शर्मांनी दिली. सुनील यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा विश्वासघात केला. त्यांचे पैसे हडपले, असा आरोप त्यांनी केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुनीलनं व्हिडीओमध्ये ज्यांची नावं घेतली आहेत, नोटमध्ये ज्यांचा उल्लेख केला आहे, त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here